सिरियातील तुर्कीच्या लष्करी तळावर मोठा हवाई हल्ला

तेहरान – उत्तर सिरियाच्या राक्का प्रांतात तुर्कीने प्रस्थापित केलेल्या लष्करी तळावर हवाई हल्ला झाला. लढाऊ विमानाने हा हल्ला चढविला, पण हे विमान कुठल्या देशाचे ते उघड झालेले नाही. तुर्कीचे लष्कर सिरियातील अमेरिका समर्थक ‘पिपल्स प्रोटेक्शन युनिट्स’ (वायपीजी) या कुर्द संघटनेवर कारवाईसाठी तयारी करीत असताना हा हल्ला झाला. तुर्की किंवा सिरियन सरकारने या हल्ल्याबाबत तपशील प्रसिद्ध केलेले नाहीत.

राक्का प्रांतातील ‘अईन इस्सा’ या भागात तुर्कीच्या लष्कराचा मोठा तळ आहे. गुरुवारी संध्याकाळी अज्ञात विमानाने वेगाने उड्डाण भरून या तळावर हल्ला चढविला, अशी माहिती कुर्द वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केली. रशिया तसेच इराणच्या वृत्तवाहिनीने या बातमीला प्रसिद्धी दिली. पण या हल्ल्यात तुर्कीच्या लष्करी तळाचे किती नुकसान झाले किंवा जीवितहानी आणि वित्तहानीची माहिती कुठल्याही माध्यमाने प्रसिद्ध करण्याचे टाळले. त्यामुळे या हल्ल्याबाबतचे गूढ अधिकच वाढले आहे.

गेल्या काही वर्षांपासून सिरियाच्या उत्तरेकडील ताल अबयाद भागात तुर्कीचे लष्कर आणि वायपीजी या कुर्द बंडखोरांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. वायपीजी ही तुर्कीतील ‘कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी’ (पीकेके) या कुर्द संघटनेशी संलग्न आहे. तुर्कीने पीकेकेला दहशतवादी संघटना घोषित केले असून वायपीजी तसेच इराकमधील पेशमर्गा व पीव्हायडी या कुर्द संघटनांनाही तुर्की दहशतवादी संघटनाच मानत आली आहे. त्यामुळे तुर्कीकडून पीकेके प्रमाणे वायपीजी, पेशमर्गा, पीव्हायडी या संघटनांवर हल्ले चढविले जातात.

वायपीजी ही सिरियातील कुर्दांची सशस्त्र संघटना असून गेली काही वर्षे सिरियातील गृहयुद्धात सहभागी झाली आहे. अमेरिकेने सिरियात पुकारलेल्या ‘आयएस’विरोधी संघर्षात वायपीजीने महत्त्वाची भूमिका स्वीकारली होती. सिरियातील अस्साद राजवटीच्या विरोधात पेटलेल्या गृहयुद्धातही वायपीजीने सहभाग घेतला होता.

पण गेल्या दोन वर्षांपासून रशियाने मध्यस्थी केल्यानंतर वायपीजीने अस्साद राजवटीशी जुळवून घेतले आहे. या दोन वर्षांमध्ये तुर्कीच्या लष्कराच्या वायपीजीवरील हल्ल्यांना सिरियन लष्करानेही उत्तर दिले होते. तर सिरियन लष्कराच्या या कारवाईला रशियानेही साथ दिली होती. वायपीजीनेही सिरियामध्ये नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणुकीत अस्साद यांच्याविरोधात आपला उमेदवार उभा न करण्याची भूमिका स्वीकारली आहे.

गेल्या काही दिवसांपासून तुर्कीने इराकमधील कुर्दिस्तान प्रांतात हल्ले सुरू केले आहेत. तुर्कीच्या हल्ल्यांवर इराक सरकारबरोबरच इराकमधील इराणसंलग्न दहशतवादी संघटनांकडूनही टीका सुरू आहे. या संघटनांनी तुर्कीच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे तुर्कीने सिरिया तसेच इराकमध्ये कुर्दांविरोधात सुरू केलेल्या कारवाईला सिरिया, इराक, इराण यांचा विरोध असल्याचे दिसत आहे.

leave a reply