पंजाब पोलिसांनी मोठा दहशतवादी हल्ला उधळला

- परदेशी बनावटीच्या 48 पिस्तूलांसह मोठा शस्त्रसाठा जप्त

नवी दिल्ली – पंजाब पोलिसांनी मोठा दहशतवादी हल्ला उधळून लावला आहे. शुक्रवारी पंजाब पोलिसांनी एका शस्त्रतस्कराकडून परदेशी बनावटीच्या 48 पिस्तूलांसह मोठा शस्त्रसाठा जप्त केला. या तस्करी गँगचा संबंध पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनेशी, तसेच अमेरिका, कॅनडा व ब्रिटनमधील भारतविरोधी खलिस्तानी गटाशी असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पकडण्यात आलेल्या तस्कराला थेट अमेरिकेतील हस्तकाकडून निर्देश मिळत होते. पकडण्यात आलेली शस्त्रास्त्रे भारतात विविध भागात दहशतवादी कारवायांसाठी व सामाजिक सलोखा बिघडविण्यासाठी पाठविली जाणार होती, असा दावाही पंजाब पोलिसांनी केला आहे.

पंजाब पोलिसांनी मोठा दहशतवादी हल्ला उधळला - परदेशी बनावटीच्या 48 पिस्तूलांसह मोठा शस्त्रसाठा जप्तपंजाब पोलिसांचा अंतर्गत सुरक्षा विभाग असलेल्या एसएसओसीच्या अधिकार्‍यांनी अमृतसरच्या कथूनंगल गावातून जगजित सिंग नावाच्या तस्कराला अटक केली. एसएसओसीच्या अधिकार्‍यांना या तस्करीबाबत गोपनिय माहिती हाती लागली होती. त्यानंतर सापळा रचून जगजित सिंग याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे दोन बॅगमध्ये परदेशी बनावटीची 48 अत्याधुनिक पिस्तूल सापडली. यामध्ये तुर्की बनावटीच्या 9 एमएमच्या 19 पिस्तूल व 37 मॅगझिनचा समावेश आहे. तसेच तसेच चिनी बनावटीच्या 30 बोरची 9 पिस्तूल्सही जप्त करण्यात आली आहेत. या चिनी बनावटीच्या पिस्तूलांची 22 मॅगझिनही ताब्यात घेण्यात आली आहे. याशिवाय पिस्तूलांशिवाय मोठा दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे.

पकडण्यात आलेला तस्कर जगजित सिंगला फरार तस्कर व गँगस्टर दरमनजित सिंगकडून थेट सूचना मिळत होत्या. दरमनजित सिंग सध्या अमेरिकेत असल्याचे सांगितले जाते. 2017 ते 2020 मध्ये दुबईत असताना जगजितचा संबंध दरमनजितशी आला. दरमनजित हा 2017 पासून भारतातून फरार आहे. याआधी पंजाबमध्ये त्याच्यावर कित्येक गुन्हे दाखल आहेत. तसेच हरविंदर सिंग उर्फ मन्नूला 2017 साली कारागृहातून फरार करण्यातही दरमनजितचा हात असल्याचे सांगितले जाते.

पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय भारतात दहशतवादी हल्ले घडविण्यासाठी आता स्थानिक गुन्हेगार टोळ्यांचा वापर करीत असल्याचे विविध प्रकरणात समोर आले आहे. तसेच पंजाबमध्ये दहशतवाद पुन्हा जिवंत करण्यासाठीही आयएसआय सतत प्रयत्न करीत आहे. पंजाब पोलिसांनी गेल्या काही वर्षात असे कित्येक प्रयत्न उधळून लावले आहेत. पाकिस्तानच्या समर्थनाने सुरू असलेली दहशतवादी मॉड्यूल उद्ध्वस्त करण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून मोठी मोहिम हाती घेतली आहे. तसेच केंद्रीय गुप्तचर व तपास संस्थाही पंजाबमधील या हालचालींवर सतत लक्ष ठेवून असून पंजाब पोलिसांच्या मदतीनेही ही मॉड्यूल नष्ट करीत आहेत.

गेल्या चार वर्षात सामाजिक सलोखा बिघडविण्यासाठी व अस्थैर्य माजविण्यासाठी आखण्यात आलेले कितीतरी कट पंजाबमध्ये उधळण्यात आले. एकूण 44 दहशतवादी मॉड्यूल उद्ध्वस्त करण्यात आली. या मोहिमेत चार वर्षात 282 दहशतवादी व गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले. तसेच 21 रायफल, 163 पिस्तूल्स, 38 हॅण्डग्रेनेड, 10 ड्रोन, पाच सॅटेलाईट फोन आणि मोठ्या प्रमाणावर आरडीएक्स सारखी स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.

leave a reply