चीनच्या वाढत्या घुसखोरीवर मलेशियाचा भडका उडू शकतो

- आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकांचा दावा

तैपेई – दहा दिवसांपूर्वी चीनच्या 16 विमानांनी मलेशियाच्या हवाईहद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला. मलेशियन हवाईदलाने चिनी विमानांना पिटाळून लावले व त्यानंतर चीनच्या राजदूतांना कठोर शब्दात समन्स बजावले. चीनच्या गुंतवणुकीमुळे मलेशियाने सदर प्रकरण चिघळू दिले नाही. पण येत्या काळात चीनने अशा कुरापती सुरू ठेवल्या तर मलेशियामध्ये खदखदत असलेल्या संतापाचा उद्रेक होईल, असा दावा आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक करीत आहेत.

चीनच्या वाढत्या घुसखोरीवर मलेशियाचा भडका उडू शकतो - आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकांचा दावागेल्या 12 वर्षांपासून चीन हा मलेशियाचा सर्वात आघाडीचा व्यापारी सहकारी आहे. मलेशियाच्या पायाभूत सुविधांमध्ये चीनने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. या सहकार्याचा गैरफायदा घेऊन चीनच्या गस्तीनौका आणि मच्छिमार नौकांनी याआधी मलेशियाच्या सागरी हद्दीत घुसखोरी केल्याच्या घटनांची नोंद झाली होती. पण फिलिपाईन्स किंवा व्हिएतनाम या शेजारी आग्नेय आशियाई देशांप्रमाणे मलेशियाने चीनच्या घुसखोरीविरोधात राजकीय किंवा लष्करी आक्रमकता दाखविली नव्हती.

पण या महिन्याच्या सुरुवातीला चीनच्या हवाईदलाच्या 16 विमानांनी हवाईहद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केल्यानंतर मलेशियाच्या संयमाचा बांध तुटला. चिनी विमानांना ‘वॉर्निंग’ देण्यासाठी मलेशियाने आपली विमाने रवाना केली. तसेच ‘राजनैतिक पातळीवर एखाद्या देशाशी मैत्रीपूर्ण संबंध असणे, याचा अर्थ आम्ही आमच्या राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करु असा होत नाही’ं, असा स्पष्ट संदेश मलेशियाने चीनच्या राजदूतांना दिला. मलेशियातून चिनी राजदूतांच्या हकालपट्टीची मागणीही झाली होती.

चीनने सारवासारवीची भूमिका घेत विमाने आपल्या नियमित प्रशिक्षणाचा भाग असलेल्या क्षेत्रात सराव करीत होती, असे म्हटले. यानंतर मलेशियाने सदर प्रकरण वाढविले नाही. पण मलेशियाने अमेरिकेबरोबर लष्करी सहकार्य वाढविण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. पुढच्या काळात चीनने सागरी किंवा हवाई हद्दीत घुसखोरी केलीच तर मलेशिया फार काळ शांत राहणार नाही. मलेशियातील चीनविरोधी असंतोषाचा भडका उडू शकतो, असा दावा अमेरिका, मलेशिया आणि सिंगापूरमधील सामरिक विश्‍लेषक देत आहेत. तसे संकेत मलेशियाकडून दिले जात आहेत.

leave a reply