आतापर्यंत मल्ल्या, नीरव मोदी, चोक्सीच्या 18 हजार कोटींच्या मालमत्ता जप्त – शेअर्स विकून बँकांची 5800 कोटी रुपयांची वसुली केल्याची ईडीची माहिती

नवी दिल्ली – भारतीय बँकांना हजारो कोटी रुपयांना फसवून परदेशात पळालेल्या विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहूल चोक्सीच्या 18 हजार 170 कोटींच्या मालमत्ता आतापर्यंत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ताब्यात घेतल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या या मालमत्ताचे मूल्य या तिघांनी केलेल्या एकूण घोटाळ्याच्या 80 टक्के आहे. यातील 9041.5 कोटी रुपयांच्या मालमत्ता बँकांकडे कर्जवसुलीसाठी हस्तांतरीत करण्यात आल्याची माहिती ईडीने दिली आहे. मल्ल्या, नीरव मोदी आणि चोक्सीने केलेल्या या कर्जघोटाळ्याच्या वसुलींच्या चिंतेत असलेल्या बँकांना यामुळे काहीअंशी दिलासा मिळाला आहे. बुधवारी ईडीने बँकांच्या ताब्यात दिलेल्या शेअर्सच्या विक्रीतून बँकांना 5 हजार 800 कोटी रुपये मिळाल्याची माहिती ईडीने दिली.

नीरव मोदीसाधारण पाच वर्षांपूर्वी किंगफिशर एअरलाईन्सचा मालक विजय मल्ल्या बँकांची सुमारे 9 हजार कोटी रुपयांची फसवणूक करून भारतातून लंडनमध्ये फरार झाला होता. तर चार वर्षांपूर्वी हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहूल चोक्सी या दोघांनी पीएनबी बँकेची 13 हजार कोटी रुपयांची फसवणूक करून देश सोडला होता. या तिघांनी मिळून भारतीय बँकांचे आतापर्यंत 22 हजार 585 कोटी रुपयांचे नुकसान केले आहे. बँकांच्या या झालेल्या नुकसानीपैकी 80 टक्के किंमतीच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. ईडीने दिलेल्या माहितीनुसार एकूण 18 हजार 170 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या. यातील 9 हजार 41 कोटी रुपयांच्या मालमत्ता बँकांकडे ईडीने कर्जवसुलीसाठी हस्तांतरीत केल्या आहेत. एकूण घोटाळ्याच्या 40 टक्के इतके या मालमत्तांचे मूल्य आहे.

काही दिवसांपूर्वीच दोन वेगवेगळ्या निर्णयात मनी लॉण्डरिंग अ‍ॅक्ट कोर्टाने (पीएमएलए) ईडीला विजय मल्ल्याच्या जप्त केलेल्या 5 हजार 646 कोटींच्या मालमत्ता बँकांना सोपविण्याचे निर्देश दिले होते. यानुसार फसवणूक झालेल्या 17 बँकाच्या कन्सोर्टियमला अर्थात संघाचे नेतृत्व करणार्‍या एसबीआयकडे या मालमत्ता सोपविण्यात आल्या. विजय मल्ल्याचे 6 हजार 600 कोटी रुपयांचे युनायटेड ब्रेवरीजमध्ये असलेले शेअर्स बँकांकडे सोपविण्यात आले. यातील काही शेअर्सची विक्री एसबीआय कन्सोर्टियमच्या वतीने ॠण वसुली न्यायाधीकरणाने (डीआरटी) बुधवारी केली. या शेअर विक्रीतून 5 हजार 800 कोटी रुपये बँकांना मिळाले आहेत.

25 जून रोजी आणखी 800 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री करण्यात येणार असल्याची माहितीही ईडीकडून देण्यात आली.

leave a reply