कॅनडाच्या लष्कराकडे ‘युएफओ’ पाहिल्याच्या नोंदी

- अमेरिकन माध्यम कंपनीचा दावा

न्यूयॉर्क – 1950 च्या दशकापासून ते आत्तापर्यंत, गेल्या 70 वर्षांमध्ये उडत्या तबकड्या अर्थात ‘युएफओ’बाबतच्या डझनहून अधिक नोंदी कॅनडाच्या लष्कराकडे आहेत. सुपरसोनिक वेगाने प्रवास करणार्‍या या युएफओचे पुरावे म्हणून कॅनेडियन लष्कराकडे काही व्हिडीओज् असल्याचा दावा अमेरिकन माध्यम कंपनीने केला. येत्या महिन्याच्या अखेरीस अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉन परग्रहवासी आणि उडत्या तबकड्यांबाबत महत्त्वाचा अहवाल प्रसिद्ध करणार आहे. त्याआधी कॅनडाच्या लष्कराकडे युएफओच्या नोंदी असल्याची बातमी महत्त्वाची ठरते.

कॅनडाच्या लष्कराकडे ‘युएफओ’ पाहिल्याच्या नोंदी - अमेरिकन माध्यम कंपनीचा दावाअमेरिकन माध्यम कंपनी ‘वाईस’ने कॅनडाचे लष्कर आणि युएफओबाबत सार्वजनिक असलेल्या नोंदी, मुलाखतींच्या आधारावर एक बातमी नुकतीच प्रसिद्ध केली. यामध्ये कॅनडाच्या संरक्षणदलांनी युएफओ पाहिल्याच्या रितसर नोंदी केल्याचे म्हटले आहे. 1950 सालच्या मार्च महिन्यात ओटावा येथे कॅनेडियन हवाईदलाच्या दोन अधिकार्‍यांनी युएफओ दिसल्याची नोंद केली होती. त्यानंतर 1952 पासून ते 2008 सालापर्यंत कॅनडाच्या नॉर्थ बे, मूज् जॉ, बॉर्डन, मॅनिटोबा, विनिपेग, रेजिना येथील कॅनडाच्या लष्कर, हवाईदलाच्या तळांच्या परिसरात उडत्या तबकड्या पाहण्यात आल्या होत्या.

कॅनडाच्या लष्कराकडे ‘युएफओ’ पाहिल्याच्या नोंदी - अमेरिकन माध्यम कंपनीचा दावायापैकी 1952 साली नॉर्थ बे येथील दोन अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उडत्या तबकड्यांचा वेग ‘एफ-86’ विमानांच्याही दुप्पट होता. 1950च्या दशकात ‘एफ-86’ विमानांच्या वेग त्या काळात सर्वाधिक 650 मैल प्रति तास इतका होता. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांनी पाहिलेल्या उडत्या तबकड्या सुपरसोनिक वेगाने प्रवास करीत असाव्या, असे या बातमीत म्हटले आहे. तर 1978 साली मूज् जॉ तळावर एका वरिष्ठ अधिकार्‍यासह उपस्थित जवानांनी वर्तुळाकार आकाराच्या चार तबकड्या पाहिल्याची नोंद केली.

2007 साली पुन्हा एकदा नॉर्थ बे तळावर उपस्थित डझनावरी प्रत्यक्षदर्शींनी युएफओ पाहिली तसेच त्याचा व्हिडिओ तयार केला. पण तो व्हिडिओ सार्वजनिक करण्यात आला नव्हता. लष्कर व हवाईतळांशिवाय कॅनडाच्या नौदलाने देखील उडत्या तबकड्यांचा अनुभव नोंदविल्याचे या बातमीत म्हटले आहे. 1968 साली कॅनडाच्या नौदलातील दोन विनाशिकांमधील जवानांनी पॅसिफिक हवाईहद्दीत उडत्या तबकड्या विशिष्ट रचनेत उडत असल्याची नोंद केली.

कॅनडाच्या लष्कराकडे ‘युएफओ’ पाहिल्याच्या नोंदी - अमेरिकन माध्यम कंपनीचा दावाकॅनडाच्या लष्करातून निवृत्त झालेल्या अधिकार्‍यांनीही उडत्या तबकड्या पाहिल्याची माहिती वाईसने प्रसिद्ध केली. यावर कॅनडाच्या लष्कराने प्रतिक्रिया दिलेली नाही. परग्रहवासी आणि उडत्या तबकड्यांबाबतचे जगभरातील कुतूहल वाढत चालले आहे. अमेरिकेच्या यंत्रणांकडे याबाबत खात्रीलायक माहिती असल्याचा दावा केला जातो. या उडत्या तबकड्यांबाबतचे व्हिडिओ याआधी प्रसिद्ध झाले होते. पण अमेरिकन यंत्रणांनी यावर अधिकृतरित्या प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते.

पण दोन वर्षांपूर्वी अमेरिकेच्या नौदलाने पहिल्यांदा एफ-18 विमानाच्या गन कॅमेरातून चित्रित झालेल्या तीन व्हिडिओमध्ये उडत्या तबकड्या असल्याची कबुली दिली होती. अमेरिकी नौदलाने ही कबुली दिल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर गेल्या वर्षी अमेरिकेच्या संरक्षण विभागाने उडत्या तबकड्यांच्या अभ्यासासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना केली होती. यासंबंधीचा अहवाल येत्या महिनाअखेरीस प्रसिद्ध होणार आहे.

leave a reply