कारगिल युद्धातील शहिदांचे निरंतर स्मरण राहिल

- कारगिल विजयदिनी पंतप्रधान व संरक्षणमंत्र्यांचा संदेश

नवी दिल्ली – कारगिलच्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांचे देशाला कधीही विस्मरण होणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे. 22 व्या कारगिल विजयदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान व संरक्षणमंत्र्यांनी हा संदेश दिला. कारगिलच्या युद्धातील विजय भारतीय सैनिकांच्या शौर्य आणि पराक्रम तसेच बलिदानाची सुवर्णगाथा ठरतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैनिकांनी देशाला हा विजय मिळवून दिला, याची दुसर्‍या कशाशीही तुलना करता येणार नाही, असे उद्गार संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी काढले आहेत.

कारगिल युद्धातील शहिदांचे निरंतर स्मरण राहिल - कारगिल विजयदिनी पंतप्रधान व संरक्षणमंत्र्यांचा संदेशजम्मू व काश्मीरच्या बारामुल्ला येथील युद्धस्मारकाला भेट देऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कारगिलचा विजयदिन साजरा केला. खराब हवामानामुळे राष्ट्रपतींचा लडाखच्या द्रास भागातील दौरा रद्द करण्यात आला. पण देशभरात कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने शहिदांचे स्मरण केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या युद्धात बलिदान देणार्‍या सैनिकांचे निरंतर स्मरण राहिल, असे म्हटले आहे. त्याचवेळी माजी लष्करी अधिकारी कारगिलच्या युद्धाच्या आठवणी सांगून या युद्धानंतर झालेल्या बदल व सुधारणांकडे लक्ष वेधत आहेत.

पाकिस्तानच्या एलओसी बरोबरच चीनबरोबरील एलएसीवरूनही भारताच्या सुरक्षेला आव्हान मिळत आहे. चीनने लडाखच्या एलएसीवर भारताला नव्याने आव्हान देण्याची तयारी केल्याच्या बातम्या आल्या आहेत. याविरोधात भारतीय सैन्याने तयारी केली असून एलओसीवर तैनात असलेली सुमारे 15 हजार सैनिकांची तुकडी आता चीनलगतच्या एलएसीजवळ तैनात करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर, देश कारगिल युद्धाचा 22 वा विजयदिन साजरा करीत आहे. म्हणूनच निमित्ताने संरक्षणमंत्र्यांनी दिलेल्या संदेशाचे महत्त्व देखील वाढले आहे.

कारगिल युद्धातून मिळालेला धडा देशाने पूणपणे आत्मसात केला आहे, असे माजी लष्करप्रमुख वेद प्रकाश मलिक म्हणाले. त्याचवेळी कारगिल युद्धाच्या काळात भारतीय सैन्याला पाकिस्तानची भूमी ताब्यात घेण्याचे आदेश मिळायला हवे होते, अशी अपेक्षा माजी लष्करप्रमुख मलिक यांनी व्यक्त केली. भारतीय लष्कर आपल्या सीमेत राहूनच कारगिल युद्ध लढेल, असे भारताने त्यावेळी जाहीर केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर, माजी लष्करप्रमुखांनी ही अपेक्षा व्यक्त केली.

leave a reply