कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस व्हेरिअंट’चा मुकाबला करण्यासाठी लसीकरणाबरोबरच ‘मास्क’ व इतर उपाययोजना आवश्यक – जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांचा इशारा

‘डेल्टा प्लस व्हेरिअंट’चा मुकाबलाजीनिव्हा/केपटाऊन/लंडन – कोरोनाव्हायसरच्या अधिक वेगाने संक्रमित होणार्‍या ‘डेल्टा प्लस व्हेरिअंट’चा मुकाबला करण्यासाठी लसीकरणाबरोबरच ‘मास्क’ व इतर उपाययोजनांची अंमलबजावणी अत्यावश्यक आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) तज्ज्ञांनी दिला. डेल्टा प्रकारातील व्हेरिअंटस्च्या विरोधात फक्त लस पुरेशी ठरणार नाही, असे ‘डब्ल्यूएचओ’च्या रशियातील प्रतिनिधी मेलिता वुज्नाव्हिक यांनी बजावले. गेल्या काही दिवसात आफ्रिकेसह ब्रिटन, रशिया, भारत, इंडोनेशिया, तैवान यासारख्या देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा वेगाने वाढत असल्याचे समोर आले आहे. या वाढीमागे ‘डेल्टा’ व ‘डेल्टा प्लस’ हे प्रकार कारणीभूत ठरत असल्याचे उघड झाले आहे.

‘डेल्टा प्लस व्हेरिअंट’चा मुकाबला

लसीकरण आवश्यक आहेच, कारण त्यामुळे विषाणू पसरण्याची व अधिक गंभीर आजार होण्याची शक्यता कमी होते. पण त्याचवेळी अतिरिक्त उपाययोजनाही महत्त्वाच्या आहेत. कोरोनाच्या नव्या प्रकारांचा मुकाबला करायचा असेल तर लस अधिक मास्क आवश्यक ठरतो. डेल्टासारख्या प्रकाराला रोखण्यासाठी फक्त लस पुरेशी ठरु शकत नाही. आपल्याला सर्वांना अत्यंत कमी वेळात खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. नाहीतर पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल’ असे मेलिता वुज्नाव्हिक यांनी बजावले.

गेल्या वर्षी भारतात कोरोनाचा ‘डेल्टा व्हेरिअंट’ आढळला होता. या प्रकारामुळे कोरोनाची साथ पुन्हा वेगाने फैलावण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर आता या व्हेरिअंटमध्ये बदल होउन ‘डेल्टा प्लस’ हा नवा प्रकार तयार झाल्याचे समोर आले आहे. हा नवा प्रकार सहजतेने व वेगाने संक्रमित होत असल्याची माहिती समोर येत आहे. फुफ्फुसाच्या पेशींमध्ये सहजतेने पसरणारा हा नवा प्रकार ‘अँटीबॉडी थेरपी’ला दाद देत नसल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे याचा संसर्ग अधिक धोकादायक ठरु शकतो, असे दावे वैद्यकक्षेत्रातील तज्ज्ञांकडून करण्यात येत आहेत.

‘डेल्टा प्लस व्हेरिअंट’चा मुकाबलादरम्यान, कोरोनाच्या नव्या ‘डेल्टा व्हेरिअंट’मुळे रशिया, ब्रिटन व दक्षिण आफ्रिकेत रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याचे समोर येत आहे. शुक्रवारी रशियात कोरोनाचे 20 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. हा जानेवारी महिन्यानंतरचा उच्चांक असल्याचे स्थानिक यंत्रणांनी सांगितले. राजधानी मॉस्कोतही एका दिवसात 7 हजार 900 हून अधिक रुग्णंाची नोंद झाली आहे. ब्रिटनमध्ये शनिवारी 18 हजार 270 रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली. 5 फेब्रुवारीनंतरची ही सर्वोच्च पातळी असल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी गेल्या सात दिवसात ब्रिटनमध्ये कोरोनाचे एक लाखांहून अधिक रुग्ण आढळले असून ही वाढ ‘डेल्टा व्हेरिअंट’मुळे असल्याचे स्पष्ट झाले आहे. दक्षिण आफ्रिकेतही कोरोनाच्या साथीने हाहाकार उडविला असून 24 तासात 18 हजार, 762 नवे रुग्ण आढळले आहेत. देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 18 लाख, 95 हजारांवर गेली आहे. तर कोरोनामुळे दगावणार्‍यांची संख्या 59 हजारांवर गेल्याची माहिती स्थानिक यंत्रणेने दिली. ‘डेल्टा व्हेरिअंट’ दक्षिण आफ्रिकेत कोरोनाची तिसरी लाट फैलावत आहे, असा दावा देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी केला आहे.

leave a reply