चीनच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून तैवान व अमेरिकेच्या तटरक्षकदलाची बैठक

तटरक्षकदलाची बैठकतैपेई/वॉशिंग्टन/बीजिंग – चीनकडून सातत्याने देण्यात येणाऱ्या धमक्या व इशाऱ्यांनंतरही तैवान आणि अमेरिकेचच्या तटरक्षकदलांची बैठक पार पडली. या बैठकीत, तैवाननजिकच्या सागरी क्षेत्रात सुरू असलेल्या बेकायदा व अनियंत्रित कारवायांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्याचवेळी सागरी क्षेत्रात संयुक्त मोहिमा राबविण्यावरही चर्चा झाल्याची माहिती तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. चीनचे नौदल व ‘नेव्हल मिलिशिआ’ सातत्याने तैवानच्या क्षेत्रात घुसखोरीचे प्रयत्न करीत असताना झालेली ही बैठक लक्ष वेधून घेणारी ठरते.

गेल्या काही महिन्यात चीन तैवानच्या मुद्यावरून अधिकाधिक आक्रमक होताना दिसत आहे. गेल्याच महिन्यात कम्युनिस्ट पार्टीचे सर्वेसर्वा व चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी तैवानच्या विलिनीकरणाच्या मुद्यावरून आक्रमक शब्दात इशारा दिला होता. ‘तैवानच्या स्वातंत्र्यासाठी सुरू असलेले कोणत्याही प्रकारचे प्रयत्न ठाम निर्धारासह कारवाई करून हाणून पाडले जातील’, असे जिनपिंग यांनी बजावले होते. हा इशारा देत असतानाच चीनने तैवाननजिकच्या क्षेत्रातील संरक्षणदलांच्या हालचालींनाही वेग दिला आहे.

तैवानच्या सामुद्रधुनीसह ‘ईस्ट चायना सी’ क्षेत्रात तब्बल दीडशे ‘स्टेल्थ’ लढाऊ विमाने तैनात करण्यात आली आहेत. जून महिन्यापासून ‘साऊथ चायना सी’मध्ये सातत्याने युद्धसराव सुरू असून यात तैवानवरील आक्रमणाची रंगीत तालीम असणाऱ्या सरावांचाही समावेश आहे. दुसऱ्या बाजूला चीनच्या मच्छिमारी जहाजांचा व बोटींचा समावेश असणारा ‘नेव्हल मिलिशिआ’ तैवानच्या हद्दीत सातत्याने घुसखोरी करीत असल्याचे समोर आले आहे. चीनची लढाऊ विमाने व युद्धनौकाही तैवानच्या क्षेत्रात धडका देत आहे. चीनकडून ‘ग्रे झोन वॉरफेअर’ची तीव्रता वाढविण्यात येत असतानाच अमेरिकेकडूनही तैवानला करण्यात येणाऱ्या सहकार्याची व्याप्ती वाढताना दिसत आहे.

तटरक्षकदलाची बैठकदोन देशांच्या तटरक्षकदलांमधील ‘मरिन पेट्रोल वर्किंग ग्रुप’ची बैठक त्याचेच संकेत मानले जातात. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या तटरक्षकदलाने आपल्या धोरणात बदलाचे संकेत देताना, आवश्‍यकता भासल्यास पॅसिफिक क्षेत्रातही मोहिमा राबविण्याचे संकेत दिले होते. हे संकेत चीनसाठी इशारा मानला जातो. यानंतर तैवानच्या तटरक्षकदलाबरोबर बैठक घेऊन अमेरिकेने संयुक्त मोहिमा राबविण्याची शक्यता वर्तविली आहे. त्याचवेळी पॅसिफिक क्षेत्रातील बेकायदा कारवायांवरही टीकास्त्र सोडले आहे.

या बैठकीपाठोपाठ अमेरिकेने डिसेंबर महिन्यात होणाऱ्या ‘वर्ल्ड डेमोक्रसी समिट’मध्ये तैवानला आमंत्रित करण्याचेही संकेत दिले आहेत. ही परिषद अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या धोरणाचा भाग मानला जातो. याविषयी करण्यात आलेल्या घोषणेत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी तैवानचा लोकशाहीवादी देश म्हणून उल्लेख केला होता. ही बाब चीनला चांगलीच झोंबली असून सरकारी मुखपत्र असणाऱ्या ‘ग्लोबल टाईम्स’ने आक्रमक शब्दात धमकावले आहे.

‘डेमोक्रसी समिट’मध्ये तैवानला आमंत्रण दिल्यास ही बाब अमेरिका व तैवान या दोन्ही देशांनी चीनने दिलेली ‘रेड लाईन’ उल्लंघणारी ठरेल. या उल्लंघनाला प्रत्युत्तर देण्यासाठी चीनची लढाऊ विमाने तैवानच्या हद्दीवरून उड्डाण करतील व कठोर कारवाई केली जाईल, असे ‘ग्लोबल टाईम्स’च्या लेखात धमकावण्यात आले आहे. चीनच्या ‘तैवान अफेअर्स ऑफिस’कडूनही अमेरिकेला इशारा देण्यात आला असून, अमेरिकेने तैवानच्या स्वातंत्र्याचे समर्थन करणाऱ्या गटांना चुकीचे संदेश देणे थांबवावे, असे बजावले आहे.

दरम्यान, गुरुवारी चिनी हवाईदलाच्या सहा विमानांनी तैवानच्या हद्दीत घुसखोरी केल्याची घटना समोर आली आहे. यात चार लढाऊ विमाने व दोन टेहळणी विमानांचा समावेश आहे. लढाऊ विमानांमध्ये ‘जे-16’चा सहभाग असून ‘शांक्सी वाय-8 ईडब्ल्यू’ व ‘शांक्सी वाय-8 एलिन्ट’ या टेहळणी विमानांनी हद्दीत प्रवेश केला होता, अशी माहिती तैवानच्या संरक्षण विभागाने दिली.

यापूर्वी 17 जून रोजी चीनच्या सात विमानांनी तैवानच्या हवाईहद्दीत धडक मारली होती. त्यानंतर एकाच वेळी पाचहून अधिक विमानांनी तैवानच्या हद्दीत येण्याची गेल्या दोन महिन्यातील ही पहिलीच घटना आहे.

leave a reply