ऑस्ट्रेलियाच्या सिडनीत ‘कोरोना लॉकडाऊन’च्या अंमलबजावणीसाठी लष्कर तैनात करणार

- जपानच्या चार भागांमध्ये आणीबाणी घोषित

सिडनी/टोकिओ – ऑस्ट्रेलियातील ‘न्यू साऊथ वेल्स’ प्रांताची राजधानी असणार्‍या सिडनी शहरात लॉकडाऊनची मुदत वाढविण्यात आली आहे. या लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी लष्कर तैनात करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. गेले काही दिवस न्यू साऊथ वेल्स प्रांतात कोरोनाचे विक्रमी रुग्ण आढळत असून सिडनी त्याचे मुख्य केंद्र ठरले आहे. जून महिन्याच्या अखेरपासून ऑस्ट्रेलियात कोरोनाच्या साथीचा फैलाव पुन्हा वाढला असून अनेक मोठ्या शहरांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता.

ऑस्ट्रेलियाच्या सिडनीत ‘कोरोना लॉकडाऊन’च्या अंमलबजावणीसाठी लष्कर तैनात करणार - जपानच्या चार भागांमध्ये आणीबाणी घोषितकोरोनाच्या ‘डेल्टा स्ट्रेन’ने अनेक देशांमध्ये साथीच्या संक्रमणाचा वेग वाढल्याचे समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाचाही या देशांमध्ये समावेश असून रुग्णसंख्या वेगाने वाढण्यास सुरुवात झाली आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सिडनी, मेलबर्न, पर्थ, डार्विन यासारख्या शहरांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. या लॉकडाऊनविरोधात ऑस्ट्रेलियातील जनतेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनविरोधात तीव्र निदर्शनेही झाली होती.

त्यानंतर ऑस्ट्रेलियातील काही शहरांमध्ये लॉकडाऊन मागे घेण्यात आला असला तरी सिडनीतील लॉकडाऊन एक महिन्याने वाढविण्यात आला आहे. सिडनीतील काही भागांमध्ये लॉकडाऊनचे योग्य पालन होत नसल्याने स्थानिक प्रशासन व पोलिसयंत्रणांसमोरील चिंता वाढल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर लष्करी तैनातीचा निर्णय घेण्यात आला आहे. सिडनीच्या विविध भागांमध्ये 300 जवान तैनात करण्यात येणार आहेत. शहरातील काही स्वयंसेवी गटांनी लष्करी तैनातीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या सिडनीत ‘कोरोना लॉकडाऊन’च्या अंमलबजावणीसाठी लष्कर तैनात करणार - जपानच्या चार भागांमध्ये आणीबाणी घोषितसिडनीत यावर्षी अडीच हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. नव्या फैलावामागे ‘डेल्टा स्ट्रेन’बरोबरच लसीकरणाचा मंदावलेला वेग हे प्रमुख कारण मानले जाते. ऑस्ट्रेलियात आतापर्यंत फक्त 16 टक्के लसीकरण झाले आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी लसीकरणातील अपयशाची उघड कबुली दिली होती.

दरम्यान, ऑलिंपिक स्पर्धा सुरू असलेल्या जपानमध्येही कोरोनाची तीव्रता वाढत असल्याचे समोर येत आहे. गुरुवारी जपानमध्ये 10 हजारांहून अधिक रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांची संख्या तब्बल नऊ लाखांवर जाऊन पोहोचली आहे. शुक्रवारी जपानमधील ओसाका, चिबा, कनागावा व साईतामा या भागांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. तर टोकिओमधील आणीबाणीची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आल्याचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी जाहीर केले.

leave a reply