नाणेनिधीकडून कर्ज न घेऊन चूक केली

- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची कबुली

इस्लामाबाद – सत्तेवर आल्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज मिळविण्याबाबत करार केला नाही, ही आपण केलेली फार मोठी चूक होती, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मान्य केले. सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली असून याला इम्रान खान जबाबदार असल्याची जोरदार टीका विरोधी पक्ष, माध्यमे आणि जनताही करीत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर इम्रान खान यांना आपल्या चुकीची कबुली द्यावी लागली आहे.

कर्ज

विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत असताना इम्रान खान यांनी त्यावेळच्या पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या सरकारवर कर्जाची भीक मागणारे सरकार, अशी टीका केली होती. हे सरकार कर्जामागून कर्ज घेऊन पाकिस्तानचे भवितव्य गहाण टाकत असल्याचा ठपका इम्रान खान यांनी त्यावेळी ठेवला होता. तर कर्ज घेतल्याखेरीज आपल्यासमोर दुसरा पर्याय नसल्याचे नवाझ शरीफ यांच्या सरकारने म्हटले होते. आपण पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी आल्यानंतर कर्जासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे हात पसरण्यापेक्षा मरण पत्करू अशी दर्पोक्ती इम्रानखान यांनी त्यावेळी केली होती.

पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावर आल्यानंतरही इम्रान खान यांनी सुरूवातीचा काही काळ कर्ज न घेण्याचा हेका कायम ठेवला. मात्र काही महिन्यातच इम्रानखान यांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे नव्या कर्जाची मागणी करावी लागली. यावेळी नाणेनिधीने पाकिस्तानसमोर कडक शर्ती ठेवल्या व त्या इम्रानखान यांच्या सरकारने मान्य केल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता मात्र आपण कर्जासाठी घाई न करून फार मोठी चूक केली, याची कबुली इम्रान खान यांनी पाकिस्तानी पत्रकारांशी बोलताना दिली. याबरोबरच पाकिस्तानमध्ये संस्थागत सुधारणांना गती न देणे ही आपली दुसरी चूक होती, असा कबुलीजबाब इम्रान खान यांनी दिला आहे.

या दोन्ही चुकांची पाकिस्तानला फार मोठी किंमत चुकती करावी लागत आहे. पण आपल्या चुकांची कबुली देत असताना इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या अस्थैर्यामागे वेगळीच शक्ती कारणीभूत असल्याचे दावे ठोकले आहेत. काही देशांनी आघाडी केली असून त्यांना पाकिस्तान बलशाली झालेला पहायचा नाही, असा ठपका इम्रानखान यांनी ठेवला. विरोधी पक्षाकडून सरकारविरोधात तीव्र निदर्शने सुरू असताना, असे दावे ठोकून इम्रान खान अप्रत्यक्षपणे पाकिस्तानचे विरोधी पक्ष शत्रूंना सहाय्य करीत असल्याचे संकेत देत आहेत.

leave a reply