सोमालियातील अंतर्गत संघर्षात १२०हून अधिक जणांचा बळी

१२०हून अधिकमोगादिशु – सोमालियात लष्कर व स्थानिक सशस्त्र बंडखोर गटांमध्ये सुरू असलेला संघर्ष तीव्र झाला असून आतापर्यंत १२०हून अधिक जणांचा बळी गेला आहे. या संघर्षामुळे सोमालियात ‘अल शबाब’ या दहशतवादी संघटनेविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत अडचणी येऊ शकतात, असा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे. त्याचवेळी अमेरिकेनेही सोमाली लष्कराला करण्यात येणार्‍या सहकार्याचा फेरविचार करण्याचे संकेत दिले आहेत.

सोमालियात गेल्या एक दशकाहून अधिक काळ ‘अल शबाब’ ही दहशतवादी संघटना सक्रिय आहे. या दहशतवादी संघटनेविरोधात सोमाली लष्कर, आफ्रिकन युनियन तसेच अमेरिकेकडून संयुक्त मोहीम सुरू आहे. या मोहिमेत, ‘अहलु सुन्नाह वाल जामा’ (एएसडब्ल्यूजे)ही बंडखोर संघटनाही सहभागी आहे. अल शबाबविरोधातील अनेक कारवायांमध्ये या संघटनेचा सहभाग आहे. त्यामुळे सोमाली लष्कर व ‘एएसडब्ल्यूजे’मध्ये सुरू झालेला संघर्ष गंभीर बाब मानली जाते.

सोमाली सरकारबरोबर सत्तेत असलेल्या वाट्यावरून संघर्षाला सुरुवात झाल्याचे मानले जाते. ‘एएसडब्ल्यूजे’ने एक इस्लामिक गट म्हणून स्थानिक तसेच राष्ट्रीय सरकारमध्ये सहभागी करून घेण्यात यावे, अशी मागणी केली आहे. मात्र सोमालिया सरकारने ही मागणी फेटाळली आहे. त्याचवेळी गटाच्या सदस्यांनी सोमालियाच्या लष्करात सहभाग द्यावा, अशी अटही सरकारकडून घालण्यात आली आहे. ‘एएसडब्ल्यूजे’ने सरकारी मागण्या फेटाळल्या असून ‘गालमुदुग’ प्रांतातील शहरांवर ताबा मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

१२०हून अधिकयाच प्रयत्नांमधून शनिवारी सोमाली लष्कराबरोबर संघर्षाला तोंड फुटल्याचे मानले जाते. गेले तीन दिवस सुरू असलेल्या संघर्षात किमान १२० जणांचा बळी गेला असून ६०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. बळींमध्ये सोमाली लष्करातील १६ जवानांचा समावेश असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. ‘एएसडब्ल्यूजे’च्या प्रवक्त्यांनी अखेरचा सदस्य जिवंत असेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.

सध्या गालमुदुगमधील गुरीसील जिल्ह्यात मोठा संघर्ष सुरू असून किमान एक लाखांहून अधिक नागरिक विस्थापित झाल्याचा दावा संयुक्त राष्ट्रसंघटनेकडून करण्यात आला आहे. सोमालियातील या अंतर्गत संघर्षावर अमेरिकेने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ‘एएसडब्ल्यूजे’विरोधातील संघर्षात सोमाली लष्कराचे ‘डनाब’ नावाचे स्पेशल युनिट सहभागी असल्याचे उघड झाले आहे. या पथकाला अमेरिकी लष्कराकडून दहशतवादविरोधी संघर्षाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. ‘अल शबाब’विरोधातील कारवायांमध्ये या पथकाची भूमिका महत्त्वाची मानली जाते.

असे असताना ‘अल शबाब’विरोधातील मोहिमत सोमाली लष्करासह इतरांना सहकार्य करणार्‍या ‘एएसडब्ल्यूजे’विरोधात सोमाली लष्कराने छेडलेला संघर्ष अमेरिकेच्या नाराजीचे कारण ठरला आहे. या मुद्यावरून अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सोमाली लष्कराला देण्यात येणार्‍या सहाय्यावर फेरविचार करण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेचे सोमाली लष्कराला असलेले सहकार्य ‘अल शबाब’चा पराभव करण्याच्या उद्देशाने देण्यात आलेले आहे, याकडे सदर अधिकार्‍याने लक्ष वेधले.

leave a reply