जगभरात चोवीस तासात कोरोनाचे दोन लाखांहून अधिक रुग्ण

बाल्टिमोर – जगभरात कोरोनाव्हायरसने दगावलेल्यांची संख्या ५,३०,००० च्या वर पोहोचली आहे. २४ तासात जगभरात या साथीचे २,१२,००० हून अधिक रुग्ण सापडल्याची माहिती ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने(डब्ल्यूएचओ) दिली आहे. आतापर्यंत कोरोना साथीच्या कालावधीत एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमेरिका, लॅटिन अमेरिका, आखाती देश व आफ्रिका खंडात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची माहिती ‘डब्ल्यूएचओ’ने दिली.
दोन लाखांहून अधिक रुग्ण
कोरोनाव्हायरसच्या साथीने अमेरिका लॅटिन अमेरिकी देशांमध्ये सर्वाधिक जीवितहानी झाली आहे. जगभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १,१३,१७,६३७ झाल्याची माहिती अमेरिकेच्या ‘जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी’ने दिली आहे. गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये दोन लाखांहुन अधिक जणांची भर पडली आहे. कोरोना साथीत बळी जाणाऱ्यांची  एकूण संख्या ५,३१,७२९ झाल्याचे ‘जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी’ने सांगितले. कोरोनाच्या संसर्गातून बरे झालेल्यांची संख्या ६० लाखांहुन अधिक झाल्याची माहिती ‘डब्ल्यूएचओ’ने दिली आहे.
दोन लाखांहून अधिक रुग्ण
अमेरिकेत गेल्या काही दिवसात सातत्याने ५० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत असून शनिवारी ही संख्या काही प्रमाणात घटून ४५ हजारांपर्यंत खाली आली. गेल्या २४ तासात अमेरिकेत २७०हुन अधिक बळींची नोंद झाली असून एकूण बळींची संख्या १ लाख ३२ हजारांहून अधिक झाली आहे. ब्राझीलमध्ये २४ तासात सुमारे ३८ हजार कोरोनाबाधित आढळले असून एकूण रुग्णांची संख्या १५ लाख ८० हजारांहून अधिक झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये ब्राझीलमध्ये एक हजारांहून अधिक बळींची नोंद झाली असून दगवणाऱ्यांची संख्या ६४,३७५ झाली आहे.
दरम्यान, विविध देशां मध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येचे नवे रेकॉर्ड नोंदविले जात आहेत. दक्षिण आफ्रिकेत एका दिवसात १० हजारांहून अधिक रुग्ण आढळले असून एकूण संख्या १,८७,९७७ झाली आहे.  फिलिपाईन्समध्ये २४ तासात २,४३४ रुग्ण आढळले आहेत. या देशातील कोरोनाबाधितांची संख्या ४४,२५४ झाली आहे. आखाती देशांमध्ये सौदी अरेबियातील रुग्णांची संख्या दोन लाखांवर गेली असून, यूएई मधील कोरोनाबाधितांची संख्या ५० हजारांवर जाऊन पोहोचली आहे. इराणमधील कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ३८ हजार झाली असून एकूण ११,४०८ जण दगावले आहेत. युरोपमध्ये स्पेन, ग्रीस यासारख्या देशांत पुन्हा लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याचे समोर आले आहे.

leave a reply