जगभरात चोवीस तासात कोरोनाचे सहा हजाराहून अधिक बळी

वॉशिंग्टन/लंडन – गेल्या चोवीस तासात कोरोनाव्हायरसमुळे जगभरात सहा हजाराहून अधिक जणांचा बळी गेला. या साथीने अमेरिकेत १७३८ तर ब्रिटनमध्ये ७५९ जण दगावले आहेत. दरम्यान, या साथीत दगावणाऱ्यांची संख्या कमी झाली किंवा या साथीचा फैलाव कमी झाला तरी वर्षअखेरीपर्यंत ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम अजिबात शिथिल करु नयेत, असे आवाहन ब्रिटनच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने केले आहे.

कोरोनाव्हायरसचे जगभरातील थैमान सुरू असून आतापर्यंत या साथीने जगभरात १,८८,०६३ जणांचा बळी घेतला आहे. तर या साथीचे जवळपास २७ लाख रुग्ण जगभरात आहेत. यापैकी सव्वासात लाखाहून अधिक जण या साथीतून बरे झाले आहेत. अमेरिकेला या साथीचा सर्वात मोठा फटका बसला असून या देशात एकूण ४६,५८३ जण दगावले आहेत. या साथीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत लागू करण्यात आलेल्या पाच आठवड्यांच्या लॉकडाउनमुळे अमेरिकेतील दोन कोटी साठ लाख जणांनी रोजगार गमावला आहे.

ब्रिटनमधील परिस्थिती देखील भयावह बनली असून गेल्या चोवीस तासात या देशात ७५९ जणांचा बळी गेला आहे. ब्रिटनमध्ये एकूण १८,१०० जणांनी या साथीत आपले प्राण गमावले आहेत. गेल्या चोवीस तासात ब्रिटनमध्ये ४४५१ नवे रुग्ण आढळले आहेत तर या देशात एकूण १,३३,४५९ रुग्ण आहेत. ब्रिटनचे मुख्य वैद्यकीय अधिकारी ख्रिस व्हिटी यांनी देशातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. या साथीची लस शोधण्यात किमान वर्षभराचा काळ लागणार असून तोपर्यंत या साथीपासून असलेला धोका कायम राहणार असल्याचे व्हिटी यांनी बजावले आहे. म्हणूनच ही साथ नियंत्रणात आली तरी या वर्षाच्या अखेरीपर्यंत ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम अजिबात शिथिल करू नये, अशी मागणी व्हिटी यांनी केली आहे.

leave a reply