देशात विकसित झालेले अतिप्रगत तंत्रज्ञान शत्रूला चकीत करील

- वायुसेनाप्रमुख भदौरिया यांचा चीनला इशारा

नवी दिल्ली – पुढच्या काळात होणार्‍या युद्धात देशातच विकसित झालेले अतिप्रगत तंत्रज्ञानाचा वापर उत्तरेकडील सीमेवरील शत्रूंना चकीत करणारे ठरेल, असा इशारा भारताचे वायुसेनाप्रमुख आरकेएस भदौरिया यांनी दिला. आत्मनिर्भर भारत मोहिमेसंदर्भातील एका परिसंवादात बोलताना वायुसेनाप्रमुखांनी चीनचा नामोल्लेख टाळून भारताकडे चीनला धक्का देणारे अतिप्रगत तंत्रज्ञान असू शकते, याची जाणीव करून दिली आहे. याबरोबरच पुढच्या दोन दशकात वायुसेना सुमारे ३५० विमाने खरेदी करणार असल्याची घोषणा वायुसेनाप्रमुखांनी केली.

लडाखच्या एलएसीवरून चीनने माघार घेतली असली तरी इथला तणाव अजूनही कमी झालेला नाही. चीनने अजूनही भारताच्या कुरापती काढण्याचे सत्र सुरू ठेवले आहे. भारताच्या सीमेजवळील भागांसाठी चीनने नव्या लष्करी अधिकार्‍याची नियुक्ती केल्याची बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली. याआधी चीनने तीनवेळा हे अधिकारी बदलले होते. याबरोबरच भारतीय सीमेनजिकच्या क्षेत्रातील चिनी लष्कराची बांधकामे सुरू असल्याच्याही बातम्या येत आहेत. यामुळे चीनपासून भारताला संभवणारा धोका कायम असल्याचे स्पष्टपणे दिसते. याची गंभीर दखल भारतीय संरक्षणदलांकडून घेतली जात आहे.

काही दिवसांपूर्वी आयटीबीपी या एलएसीच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या निमलष्करी दलाचे मावळते प्रमुख एस. एस. देस्वाल यांनी चीनला खरमरीत इशारा दिला होता. आयटीबीपी एलएसीवर अधिक आक्रमक बनू शकते असे देस्वाल यांनी बजावले होते. त्यानंतर आता वायुसेनाप्रमुखांनी थेट नामोल्लेख टाळून चीनला योग्य तो संदेश दिला आहे. आत्मनिर्भर भारतासंदर्भातील परिसंवादाला संबोधित करताना, वायुसेनाप्रमुखांनी पुढच्या काळात देशातच विकसित झालेले अतिप्रगत तंत्रज्ञान उत्तरेकडील सीमेवर असलेल्या शत्रूला चकीत करणारे ठरेल, असे स्पष्ट केले.

आत्मनिर्भरता हा देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा पाया ठरेल, असा विश्‍वास यावेळी वायुसेनाप्रमुखांनी व्यक्त केला. याबरोबरच पुढच्या दोन दशकांच्या कालावधीत भारतीय वायुसेना तब्बल ३५० विमाने खरेदी करणार आहे, याचीही घोषणा वायुसेनाप्रमुखांनी केली.

leave a reply