पाकिस्तानच्या लाहोरमध्ये सिलेंडर्सच्या स्फोटांची मालिका

लाहोर – पाकिस्तानचे लाहोर शहर आठवड्यात दुसर्‍यांदा कानठळ्या बसणार्‍या स्फोटांनी हादरले. लाहोर शहराच्या बरकत मार्केटमध्ये मंगळवारी झालेल्या स्फोटात एकाचा बळी गेला. दहा सिलेंडर्सचा एकामागोमाग स्फोट झाल्याचे स्थानिक यंत्रणांनी म्हटले आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात लाहोरमध्ये झालेला बॉम्बस्फोट जमात-उद-दवाचा प्रमुख हफीज सईद याला लक्ष्य करण्यासाठी घडविण्यात आला होता. हल्ल्यावेळी लश्करचा प्रमुख घरातच होता, अशी माहिती पाकिस्तानातील शोधपत्रकाराने दिली. त्यामुळे हफीजला कोट लखपत तुरुंगात ठेवल्याच्या पाकिस्तान करीत असलेल्या दाव्याच्याही चिंधड्या उडाल्या आहेत. गेल्या आठवड्यातील स्फोटामुळे ’एफएटीएफ’ने पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये ठेवल्याचा अजब दावा पाकिस्तानातील काही पत्रकार करीत आहेत.

पाकिस्तानच्या लाहोरमध्ये सिलेंडर्सच्या स्फोटांची मालिकालाहोर शहरातील बरकत मार्केटमध्ये झालेल्या स्फोटाबाबत पाकिस्तानच्या सरकारी यंत्रणा तसेच लष्कराच्या दडपणाखाली असलेल्या आघाडीच्या माध्यमांनी अधिक माहिती देण्याचे टाळले. मंगळवारी रात्रीपर्यंत प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, किमान दहा सिलेंडर्सचा स्फोट झाला. या स्फोटात दहा वाहने तसेच तितक्याच दुकानांचे मोठे नुकसान झाल्याचे एका वृत्तवाहिनीने सांगितले. हा सिलेंडर स्फोट असल्याचे सांगून यामागे घातपाताची शक्यता स्थानिक यंत्रणांनी फेटाळली.

गेल्या आठवड्यात लाहोरच्या जोहर टाऊन भागात झालेला स्फोट देखील सिलेंडरचाच होता, असे दावे पाकिस्तानी यंत्रणांनी केले होते. पण स्थानिकांनी माध्यमांसमोर दिलेल्या माहितीमुळे हा बॉम्बस्फोट होता, हे पाकिस्तानच्या यंत्रणांना मान्य करावे लागले. त्यामुळे बरकत मार्केटमध्ये झालेल्या या तथाकथित सिलेंडर स्फोटाबाबत पाकिस्तानी यंत्रणा करीत असलेले दावे जसेच्या तसे स्वीकारता येणार नाहीत.

गेल्या आठवड्यात जोहर टाऊन येथे झालेल्या स्फोटाबाबत पाकिस्तानच्या यंत्रणा अजूनही बरीच लपवाछपवी करीत असल्याचा आरोप पाकिस्तानातूनच सुरू झाले आहेत. या शक्तिशाली स्फोटाचा मुख्य टार्गेट हफीज सईद होता, असा दावा पाकिस्तानी पत्रकार अमजद सईद सहानी यांनी केला. मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा सूत्रधार हफीज सईद या बॉम्बस्फोटाच्या वेळी त्याच्या कुटुंबासह घरातच होता. हफीजच्या घरापासून अवघ्या काही मीटर अंतरावर झालेल्या या स्फोटांमध्ये तीन जण ठार तर 20 हून अधिक जण जखमी झाले होते. पाकिस्तानचे सरकार आणि माध्यमांच्या दाव्यानुसार हफीज सईद सध्या कोट लखपत तुरुंगात आहे. पण अमजद सईद सहानी यांनी याबाबत वेगळीच माहिती दिली असून यामुळे पाकिस्तानसमोरच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते.

leave a reply