आखातातल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी नौदल सज्ज

नवी दिल्ली – कोरोनाव्हायरसची साथ आखाती देशांमध्येही फैलावत असताना तिथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी नौदलाने जय्यत तयारी सुरू केली आहे. भारतीय नौदलाच्या चौदा युद्धनौका यासाठी सज्ज असल्याचे भारतीय नौदलाचे उपप्रमुख ॲडमिरल जी. अशोक कुमार यांनी जाहीर केले. आखाती देशांमध्ये कोरोनाव्हायरसची साथ रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. यामुळे आखाती देशांमध्ये कार्यरत असलेले हजारो भारतीय कामगार मायदेशी परतण्यासाठी उत्सुक आहे. या भारतीयांनी आपल्याला मायदेशी परत आणण्यासाठी सरकारने व्यवस्था करावी, असे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर नौदलाने ही तयारी केल्याचे दिसत आहे.

आखाती देशांमधील बरेच भारतीय बंदरानजिक राहत असल्याने त्यांच्या सुटकेसाठी युध्दनौका अतिशय उपयुक्त ठरतील. वेस्टर्न कमांडच्या चार, इस्टर्न कमांडच्या चार आणि सदर्न कमांडच्या तीन युद्धनौका तयार असल्याचे अॅडमिरल अशोक कुमार यांनी स्पष्ट केले. सध्या संरक्षणमंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयामध्ये या संर्दभात चर्चा सुरू आहे. त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर नौदलाच्या युद्धनौका आखाताच्या दिशेने रवाना होतील. ‘आयएनएस जलाश्व’, आणि मगर श्रेणीतील अॅम्फिबियस युद्धनौका सज्ज असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याचवेळी भारतीय वायुसेनेची विमाने देखील भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी तयार आहेत.

आखाती देशांमध्ये कार्यरत असलेल्या भारतीयांकडून देशाच्या परकीय गंगाजळीत सुमारे ६५ अब्ज डॉलर अशी भर घातली जाते. पण आता आखाती देशांच्या अर्थव्यवस्था संकटात सापडल्यामुळे या देशांमध्ये कार्यरत असलेल्या भारतीयांचा रोजगारही धोक्यात आला आहे.

leave a reply