आंतरराष्ट्रीय स्तरावरील चीनची प्रतिमा नकारात्मक व डागाळलेलीच – ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या अहवालातील निष्कर्ष

वॉशिंग्टन/बीजिंग – प्रेमळ व विनम्र देश अशी चीनची प्रतिमा तयार करा, असा संदेश चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी गेल्याच महिन्यात कम्युनिस्ट पार्टीचे नेते व अधिकार्‍यांना दिल्याचे समोर आले होते. जिनपिंग यांचा संदेश नेते व अधिकार्‍यांनी मनावर घेतला असला तरी जगातील इतर देशांनी मात्र त्याला फारशी किंमत दिलेली नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनची प्रतिमा अद्यापही नकारात्मक व डागाळलेलीच असल्याचे ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या अहवालांमधून समोर आले आहे. कम्युनिस्ट पार्टीला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चीनची राजवट आपलीच पाठ थोपटून घेत असताना समोर आलेला हा अहवाल लक्षवेधी ठरतो.

अमेरिका, युरोप व आशिया पॅसिफिक क्षेत्रातील १७ प्रमुख देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून चीनची नकारात्मक प्रतिमा प्रकर्षाने समोर आली आहे. अमेरिका व कॅनडासह युरोपातील नऊ देश आणि आशिया पॅसिफिकमधील सहा देशांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. जपानमध्ये तब्बल ८८ टक्के नागरिकांनी चीनबद्दल नकारात्मक मत व्यक्त केली असून युरोपमधील स्वीडनच्या ८० टक्के नागरिकांनी चीनवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

चीनबाबत नाराजी दर्शवितानाच राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या नेतृत्त्वाबद्दलही आंतरराष्ट्रीय समुदाय फारसा आशादायी नसल्याचे स्पष्ट झाले. सिंगापूर वगळता इतर १६ देशांमधील नागरिकांनी जिनपिंग यांचे नेतृत्त्व आवडत नसल्याचे स्पष्ट केले आहे. जपानमधील फक्त १० टक्के तर स्वीडनमधील १२ टक्के नागरिकांनी जिनपिंग यांचे नेतृत्त्व योग्य असल्याचे म्हटले आहे. चीनची राजवट आपल्या जनतेला अभिव्यक्तीस्वातंत्र्य व इतर मानवाधिकार देत नसल्याचे मत जवळपास ८० टक्के नागरिकांनी व्यक्त केले आहे. ब्रिटन, इटली, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया या देशांमध्ये या मुद्यावर सर्वाधिक नाराजी असल्याचे समोर आले आहे.

जिनपिंग यांचे नेतृत्त्व व मानवाधिकारांमुळे चीनबद्दलची नाराजी वाढत असतानाच अमेरिकेबाबत सकारात्मक मत नोंदविणार्‍यांची संख्या वाढत असल्याचे ‘प्यू रिसर्च सेंटर’ने नोंदविले आहे. दक्षिण कोरिया, जपान व इटली यासारख्या देशांमधील ७० टक्क्यांहून अधिक नागरिकांनी अमेरिकेबरोबरील संबंध व राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याबद्दल सकारात्मक भूमिका मांडली आहे.

गेल्या काही वर्षांपासून राष्ट्राध्यक्ष जिनपिंग व कम्युनिस्ट राजवट प्रसारमाध्यमांसह विविध मार्गांचा अवलंब करून चीन जागतिक महासत्ता असल्याची प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न करीत आहे. चीनच्या या मोहिमेला विरोध करणार्‍यांवर पूर्वग्रहदूषित भूमिका घेणारे, शीतयुद्धकालिन मानसिकता बाळगणारे व अमेरिकेचे गुलाम म्हणून शिक्के मारण्यात येत आहेत. मात्र कोरोनाची साथ, हाँगकाँग, उघुरवंशियांवरील अत्याचार व साऊथ चायना सी यासारख्या मुद्यांवरून आंतरराष्ट्रीय समुदायात तीव्र नाराजीची भावना असून, ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या अहवालातून त्याला दुजोरा मिळत आहे.

leave a reply