नव्या लष्करी पुलांमुळे भारतीय लष्कराची पाकिस्तानच्या आघाडीवरील क्षमता वाढेल – लष्करप्रमुख जनरल नरवणे

नवी दिल्ली – ‘‘‘डीआरडीओ’ आणि खासगी कंपनीने तयार केलेल्या लष्करी पुलांमुळे रणगाडे, तोफा तसेच लष्करी वाहने पाकिस्तानच्या सीमेजवळ नेण्याच्या भारतीय लष्कराच्या क्षमतेत वाढ होईल’’, अशी घोषणा लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी केली. डिआरडीओ व एलअ‍ॅण्डटी कंपनीने तयार केलेल्या मोबाईल पोलादी पुलांना लष्करात सामील करून घेण्याच्या कार्यक्रमात लष्करप्रमुख बोलत होते.

भारताच्या पश्चिम सीमेवरील लष्कराच्या हालचालींसाठी 10 मीटर तसेच 15 मीटर लांबीच्या आणि 70 टन वजन भार सहन करणारे सुमारे 100 पूल उभारण्याची आवश्यकता होती. यासाठी 492 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. आत्तापर्यंत भारतीय लष्कराकडून वापरल्या जाणार्‍या अशा मोबाईल पोलादी पुलांची पाश्चिमात्य देशांमधून खरेदी केली जात होती. पण लष्करासाठी स्वदेशी बनावटीचे पुल तयार करण्याची जबाबदारी भारताच्या ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्था-डिआरडीओ’ तसेच ‘लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो’ या कंपनीने स्वीकारली.

त्यानुसार, शुक्रवारी भारतीय लष्कराच्या कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्सच्या पथकात 10 मीटर लांबीच्या 12 पुलांना सामील करण्यात आले. भारताच्या पश्चिम सीमेवर छोट्या नद्या आणि कालव्यांची मोठी संख्या आहे. या नद्या आणि कालव्यांतून लष्कराचे रणगाडे, तोफा व लष्करी वाहने पार करण्यासाठी अशा 10 मीटर लांबीचे पुल महत्त्वाचे ठरतील, असा विश्वास लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी व्यक्त केला.

याआधी लष्कराकडून वापरले जाणारे पोलादी पुल कार्यान्वित करण्यासाठी 30 ते 40 जवानांची गरज होती. तसेच यासाठी लष्कराचा सर्वात महत्त्वाचा अवधी मोठ्या प्रमाणात खर्च होत होता. पण हे नवे प्रगत पोलादी पुल अवघ्या आठ ते दहा मिनिटात वापरासाठी सज्ज होतात. तसेच यासाठी कमी मनुष्यबळ वापरले जाईल, असे लष्करी अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

leave a reply