लसी कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटसमोर निष्प्रभ ठरण्याचा धोका संभवतो

- जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांचा इशारा

जीनिव्हा – कोरोनाच्या साथीविरोधात सध्या उपलब्ध असणार्‍या तसेच विकसित होणार्‍या लसी भविष्यात विषाणूच्या नव्या प्रकारांविरोधात (व्हेरिअंट्स) निष्प्रभ ठरु शकतील, असा गंभीर इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) प्रमुख तज्ज्ञांनी दिला आहे. ‘डब्ल्यूएचओ’मध्ये साथीच्या रोगांच्या विशेषज्ञ असणर्‍या डॉ. मारिआ व्हॅन केर्खोव्ह यांनी सोमवारी एका ‘ब्रिफिंग’मध्ये हा इशारा दिला. लसीकरण झाले असले तरी ‘मास्क’, ‘सोशल डिस्टंसिंग’ व इतर आरोग्यविषयक उपाययोजना चालू ठेवणे आवश्यक असेल, असेही डॉ. मारिआ व्हॅन केर्खोव्ह यांनी बजावले आहे.

लसी कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटसमोर निष्प्रभ ठरण्याचा धोका संभवतो - जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांचा इशारा२०१९ सालच्या अखेरीस चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीने जगभरात हाहाकार उडविला असून अजूनही त्याचा फैलाव वेगाने चालू आहे. जगभरात सुमारे १८ कोटी कोरोना रुग्ण आढळले असून बळींची संख्या ३८ लाखांवर गेली आहे. जगातील अनेक प्रमुख देशांमध्ये साथीची दुसरी व तिसरी लाट सुरू आहे. कोरोनाव्हायरसचे नवे ‘स्ट्रेन’ विकसित होत असून त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

जगभरात सध्या कोरोना साथीच्या विरोधात पाचहून अधिक लसी उपलब्ध असून अजूनही नव्या लसी विकसित होत आहेत. लसीकरण हा कोरोनाच्या साथीविरोधातील प्रभावी उपाय ठरल्याचे काही देशांमधील घटनांमधून समोर आले आहे. जगातील प्रमुख संघटना व अनेक देशांमधील तज्ज्ञही लसीकरणाचा वेग वाढविण्याबाबत आग्रही भूमिका घेत आहेत. या पार्श्‍वभूमीवर, डॉ. मारिआ व्हॅन केर्खोव्ह यांनी केलेले वक्तव्य चिंता वाढविणारे ठरले आहे.

‘भविष्यात कोरोनाव्हायरसमध्ये अनेक बदल होउन नवे प्रकार विकसित होऊ शकतात. या नव्या प्रकारांविरोधात लसी निष्प्रभ ठरण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या विरोधात अधिक प्रभावी लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी फक्त त्यावर अवलंबून राहता येणार नाही. साथीविरोधात इतर आरोग्यविषयक उपाययोजनांचा वापरही आवश्यक ठरणार आहे’, असे ‘डब्ल्यूएचओ’च्या साथीच्या रोगांच्या विशेषज्ञ असणर्‍या डॉ. केर्खोव्ह यांनी बजावले.

डॉ. केर्खोव्ह यांच्यापूर्वी लस विकसित करणार्‍या काही संशोधकांनीही गेल्या महिन्यात नव्या ‘व्हेरिअंट्स’विरोधात लस प्रभावी ठरत नसल्याचे वक्तव्य केले होते. ‘कोरोनाचा विषाणू जसा अधिकाधिक पसरतो आहे, तसे त्यात वेगाने बदल होऊन नवे प्रकार (व्हेरिअंट्स) विकसित होत आहेत. सध्या देण्यात येणारी लस त्यातील काही प्रकारांविरोधात फारशी प्रभावी ठरलेली नाही’, असा इशारा लस विकसित करणार्‍या संशोधकांनी दिला होता.

गेल्या काही महिन्यात ब्रिटन, ब्राझिल, दक्षिण आफ्रिका व भारतात कोरोनाचे नवे व घातक प्रकार समोर आले असून त्याने साथीचा फैलाव पुन्हा वाढत असल्याचे उघड झाले होते. सध्या भारतात पहिल्यांदा आढळलेला ‘डेल्टा व्हेरिअंट’ नावाचा प्रकार विविध देशांमध्ये वेगाने पसरत असल्याची माहितीही समोर आली आहे.

leave a reply