भारत-ब्रिटन सहकार्याचे नवे पर्व सुरू झाले

- ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन

लंडन – भारत आणि ब्रिटनमधील सहकार्याचे नवे पर्व सुरू झाले आहे, अशी घोषणा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरील व्हर्च्युअल परिषदेत ब्रिटनच्या पंतप्रधानांनी हा दावा केला. ज्याची जागा दुसरा कुणीही घेऊ शकत नाही, असा सहकारी देश म्हणून ब्रिटन भारताकडे पाहत आहे, असेही पंतप्रधान जॉन्सन यांनी स्पष्ट केले. याबरोबरच २०३० सालापर्यंत उभय देशांमधील व्यापार सध्या आहे त्याच्या दुपटीने वाढविण्याचे ध्येय दोन्ही नेत्यांनी समोर ठेवले आहे. यासाठी उभय देशांमध्ये लवकरच मुक्त व्यापारी करार व धोरणात्मक भागीदारी विकसित करण्यासाठी दहा वर्षांसाठीचा आराखडा तयार करण्यात आल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले आहे.

Advertisement

कोरोनाच्या साथीमुळे ब्रिटनच्या पंतप्रधानांची भारतभेट दोन वेळा रद्द करावी लागली होती. पण उभय देशांच्या पंतप्रधानांची व्हर्च्युअल परिषद पार पडली. यात पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाविरोधी लढ्यात भारताला ब्रिटनकडून पुरविण्यात येत असलेल्या सहाय्यासाठी आभार मानले. तर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी यावेळी उभय देशांमध्ये विविध क्षेत्रातील सहकार्याची घोषणा यावेळी केली. यानुसार आरोग्य, पर्यावरण, व्यापार, शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान आणि संरक्षण या क्षेत्रात भारत व ब्रिटन परस्परांबरोबरील सहकार्य दृढ करणार आहेत.

२०३० सालापर्यंत दोन्ही देशांमध्ये धोरणात्मक भागीदारी विकसित करण्यासाठीचा नियोजनबद्ध आराखडा ‘फॉरिन, कॉमनवेल्थ अँड डेव्हलपमेंट ऑफिस’कडून (एफसीडीओ) लवकरच प्रसिद्ध केला जाईल. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही याची माहिती दिली आहे. सध्या भारत व ब्रिटनमधील वार्षिक द्विपक्षीय व्यापार २३ अब्ज पौंड इतका आहे. २०३० सालापर्यंत हा व्यापार दुपटीहून अधिक प्रमाणात वाढविण्याचे लक्ष्य दोन्ही देशांनी समोर ठेवले आहे. यासाठी दोन्ही देशांनी मुक्त व्यापारी करार करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदी व पंतप्रधान जॉन्सन यांच्या चर्चेत दोन्ही देशांनी एक अब्ज पौंड इतक्या रक्कमेचे व्यापार व गुंतवणूकविषयक करार झाले आहेत. यामुळे ब्रिटनमध्ये ६५०० जणांना रोजगार उपलब्ध होईल, असे पंतप्रधान जॉन्सन यांनी स्पष्ट केले.

आरोग्य, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यावरणविषयक विज्ञान या क्षेत्रातील संशोधनासाठी भारत व ब्रिटनच्या विद्यापीठांमध्ये सहकार्य वाढविले जाईल, असी माहिती ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे. दरम्यान, या वर्षाच्या अखेरीस ब्रिटनची विमानवाहू युद्धनौका एचएमएस क्विन एलिझाबेथ भारताला भेट देणार असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच हिंदी महासागरात भारत व ब्रिटनच्या नौदलाचा युद्धसराव संपन्न होईल.

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सध्या जी७ परिषदेसाठी ब्रिटनमध्ये दाखल झाले आहेत. ब्रिटनच्या गृहमंत्री प्रिती पटेल यांच्याशी पराष्ट्रमंत्री जयशंकर यांची चर्चा पार पडली. तसेच ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉम्निक राब यांचीही परराष्ट्रमंत्री जयशंकर भेट घेणार असून जागतिक लोकशाहीला असलेल्या धोक्यावर दोन्ही नेते सखोल चर्चा करणार असल्याचे सांगितले जाते. युरोपिय महासंघातून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनने भारताबरोबरील आपले व्यापारी संबंध अधिकच दृढ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता. मात्र कोरोनाचे संकट आल्यानंतर ब्रिटनने ही साथ रोखण्यावर सारे लक्ष केंद्रीत केले होते. तसेच ब्रिटन व त्यानंतर भारतात फैलावलेल्या कोरोनाच्या साथीमुळे ब्रिटनच्या पंतप्रधानांची भारतभेट दोन वेळा रद्द करावी लागली होती.

मात्र आता दोन्ही देशांनी आपले सहकार्य अधिकच दृढ करण्याच्या दिशेने पावले उचलल्याचे दिसू लागले आहे. कोरोनाची साथ आलेली असताना भारताला मोठ्या प्रमाणात सहाय्य पुरविणार्‍या देशांमध्ये ब्रिटनचाही समावेश आहे.

leave a reply