चीनमध्ये कोरोनाच्या साथीचा नवा उद्रेक

- फुजिअन प्रांतात कोरोनाचे रुग्ण आढळले

फुजिअनबीजिंग/फुजिआन – कोरोना साथीचा उगम असलेल्या चीनमध्ये पुन्हा एकदा साथीचा नवा उद्रेक झाल्याचे समोर आले आहे. चीनचे आर्थिक केंद्र म्हणून ओळखण्यात येणार्‍या शांघाय प्रांताच्या दक्षिणेस असलेल्या फुजिआन प्रांतात कोरोनाचे २० नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्याच महिन्यात चीनची राजधानी बीजिंग व वुहानसह १८ प्रांतांमध्ये कोरोनाच्या साथीचा उद्रेक झाल्याचे समोर आले होते.

२०१९ सालच्या अखेरीस चीनच्या वुहान शहरात कोरोना साथीचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर पुढील काही महिन्यात लॉकडाऊन, मास टेस्टिंग, मोठ्या हॉस्पिटल्सची उभारणी व स्थानिक पातळीवर विकसित केलेल्या लसीच्या जोरावर कोरोनाची साथ नियंत्रणात आणल्याचा दावा चीनच्या सत्ताधारी राजवटीने केला होता. कोरोनाचे उगमस्थान असलेल्या वुहानसह इतर शहरांमध्ये पार्टी तसेच इतर कारणांसाठी झालेल्या गर्दीचे फोटोग्राफ्सही प्रसिद्ध करण्यात आले होते.

फुजिअनआपली साथ नियंत्रणात आणल्याचे दावे करणार्‍या चीनने पाश्‍चात्यांसह इतर देशांकडून कोरोनाविरोधात राबविण्यात येणार्‍या मोहिमेवर टीकास्त्र सोडले होते. मात्र आता जवळपास वर्षभरानंतर चीनच्या अनेक प्रांतांमध्ये पुन्हा एकदा कोरोना साथीचा उद्रेक होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. या घटना चीनच्या सत्ताधारी राजवटीसह स्थानिक यंत्रणांसाठी नवे आव्हान ठरत असल्याचे सांगण्यात येते. चीनमधील नव्या उद्रेकाचे बहुतांश रुग्ण ‘डेल्टा व्हेरिअंट’चे असून हा प्रकार अधिक वेगाने पसरत आहे.

फुजिआन प्रांतातील ‘पुतिअन’ व ‘क्वानझोउ’ या दोन शहरांमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. सिंगापूरमधून माघारी आलेल्या एका नागरिकाकडून नव्या साथीचा संसर्ग सुरू झाल्याचे संागण्यात येते. गेले तीन दिवस सातत्याने रुग्ण आढळल्याने चिनी यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. गुरुवारी १७, शुक्रवारी २५ तर शनिवारी २० रुग्ण आढळले आहेत.

फुजिअनस्थानिक यंत्रणांनी पुतिअन शहरात येणार्‍या बस व रेल्वेसेवा थांबविल्या आहेत. शहराबाहेर जाणार्‍या नागरिकांसाठी कोरोनाची नकारात्मक चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्याचबरोबर थिएटर्स, जिम, पर्यटनस्थळे व इतर सार्वजनिक जागाही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चीनच्या ‘नॅशनल हेल्थ कमिशन’ने तज्ज्ञांचे एक विशेष पथक पुतिअनमध्ये धाडले आहे.

गेल्या महिन्यात चीनमध्ये आलेल्या उद्रेकानंतर चीनने अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्याचा तसेच लसीकरणाचा वेग वाढविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी चीनकडून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत असल्याची माहिती समोर आली आहे. साथ रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे मागणी व सेवा या क्षेत्रांमध्ये फटका बसेल, असा इशारा जेपी मॉर्गन या वित्तसंस्थेने गेल्याच महिन्यात दिला होता.

leave a reply