अफगाणिस्तानच्या हेल्मंड प्रांतात अमेरिकेचे नवे हवाई हल्ले

- तालिबानच्या 50 दहशतवाद्यांची अफगाणी लष्करासमोर शरणागती

काबुल – अफगाणिस्तानच्या हेल्मंड प्रांताची राजधानी ताब्यात घेऊ पाहणार्‍या तालिबानला धक्का देण्यासाठी अमेरिका व अफगाणी लष्कराने हवाई हल्ले तीव्र केले. अमेरिकेच्या विमानाने हेल्मंड प्रांताच्या दक्षिणेकडे हवाई हल्ले चढविले. तर अफगाणी विमानांनी हेल्मंडची राजधानी लश्करगहमधील तालिबानच्या ठिकाणांना लक्ष्य केले. या कारवाईत तालिबानचे जबर नुकसान झाल्याचा दावा केला जातो. तर जोवझान प्रांतातील संघर्षानंतर तालिबानच्या किमान 50 दहशतवाद्यांनी अफगाणी लष्करासमोर शरणांगती पत्करल्याची आहे. दरम्यान, हेल्मंडमधील हल्ल्यासाठी अमेरिकेच्या विमानाने पाकिस्तानच्या हवाईहद्दीचा वापर केल्याचे उघड झाले आहे.

अफगाणिस्तानच्या हेल्मंड प्रांतात अमेरिकेचे नवे हवाई हल्ले - तालिबानच्या 50 दहशतवाद्यांची अफगाणी लष्करासमोर शरणागतीअफगाणिस्तानातील हेल्मंड प्रांताची राजधानी लश्करगह ताब्यात घेतल्यानंतर हेरात, कंदहार या प्रांतांच्या राजधान्या आपल्या नियंत्रणाखाली आणण्याची योजना तालिबानने आखली आहे. यानंतर कुंदूझ, खोस्त या प्रांतांकडे तालिबान मोर्चा वळविणार असल्याची माहिती, तालिबानच्या तीन कमांडर्सनी आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. अमेरिका दोहा येथील कराराचे उल्लंघन करणार असेल तर तालिबानही याला बांधिल नसेल, असा इशारा तालिबानच्या कमांडर्सनी दिला. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेने तालिबानच्या ठिकाणांवर सुरू केलेल्या कारवाईमुळे लश्करगहवर हल्ले सुरू केल्याचा आरोप तालिबान करीत आहे.

पण दोहा येथील कराराचे उल्लंघन करून तालिबाननेच लश्करगह, हेरात शहरांवर हल्ले चढविल्याचे आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. याशिवाय तालिबानच्या दहशतवाद्यांनी काही जिल्ह्यांमध्ये महिला-मुलींवर अत्याचार सुरू केल्याच्या बातम्या येत आहेत. तर कंदहार प्रांतातील दीड महिन्याच्या संघर्षात तालिबानने आठशे ते नऊशे जणांची हत्या घडविल्याचा आरोप अफगाणिस्तानातील मानवाधिकार संघटना करीत आहे.

अफगाणिस्तानच्या हेल्मंड प्रांतात अमेरिकेचे नवे हवाई हल्ले - तालिबानच्या 50 दहशतवाद्यांची अफगाणी लष्करासमोर शरणागतीयाशिवाय तालिबान पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांबरोबर सहकार्य ठेवून असल्याचे पुरावे समोर येत आहेत. त्यामुळे अफगाणी लष्कराच्या तालिबानवरील कारवाईला स्थानिकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. तालिबानने दोहा कराराचे उल्लंघन केल्यामुळे अमेरिकेला हवाईहल्ले सुरू करावे लागल्याचे अफगाणी नेते व माध्यमांचे म्हणणे आहे.

दोन दिवसांपूर्वी अमेरिकेच्या विमानाने हेल्मंड प्रांताच्या दक्षिण भागात हल्ले चढवून तालिबानचे जबर नुकसान केले. तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्ला मुजाहिद याने यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. तर हेरात प्रांतात तालिबानची पिछेहाट सुरू झाल्याचा दावा अफगाणिस्तानच्या लष्कराने केला. दरम्यान, गेल्या महिन्याभरात अमेरिकेने तालिबानवर केलेली ही तिसरी हवाई कारवाई ठरते. तालिबानवर हल्ला चढविण्यासाठी अमेरिकेची विमाने पाकिस्तानच्या हवाईहद्दीचा वापर करीत असल्याचा आरोप पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी करीत आहेत.

आंतरराष्ट्रीय विमानवाहतुकीवर लक्ष ठेवणार्‍या कंपन्या देखील या आरोपांना दुजोरा देत आहेत. पण पाकिस्तानचे सरकार व लष्कर मात्र यावर चर्चा करायला तयार नाहीत. अमेरिकेच्या विरोधात आक्रमक भाषेचा प्रयोग करून पाकिस्तानचे नेते याकडून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी मोठ्या कसरती करीत असल्याचे दिसते.

leave a reply