अफगाण-तालिबान शांतीचर्चेच्या पार्श्वभूमीवर संघर्षाचा नवा भडका

काबूल – शनिवारी अफगाणिस्तान सरकार व तालिबानमध्ये सुरू झालेल्या शांतीचर्चेच्या पार्श्वभूमीवर देशात संघर्षाचा नवा भडका उडाला आहे. अफगाणिस्तानातील सुमारे १८ प्रांतांमध्ये अफगाण लष्कर व तालिबानदरम्यान संघर्ष सुरू असून २० तालिबानी दहशतवाद्यांना ठार केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे शांतीचर्चेनंतरही देशातील हिंसाचार नियंत्रणात येईल का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

संघर्षाचा नवा भडका

शनिवारपासून कतारमध्ये अफगाणिस्तानातील गनी सरकार आणि तालिबानमध्ये ऐतिहासिक शांतीचर्चा सुरू झाली. कतारमधील या चर्चेला, अफगाणिस्तान सरकारकडून मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुलाह अब्दुलाह तर तालिबानचा उपप्रमुख मुल्लाह अब्दुल घनी बरादर उपस्थित होते. या शांतीचर्चेने अफगाण सरकार व तालिबानमध्ये दोन दशके सुरू असलेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. चर्चेदरम्यान अब्दुलाह अब्दुलाह यांनी अफगाणिस्तानला शांतता हवी आहे, असा दावा केला. मात्र त्याचवेळी तालिबानचा उपप्रमुख बरादर याने अफगाणिस्तानात इस्लामी राजवट स्थापन करायची आहे, असे सांगून तालिबानचे इरादे स्पष्ट केले होते.

संघर्षाचा नवा भडकारविवारी अफगाणिस्तानातील तब्बल १८ प्रांतांमध्ये सुरु झालेल्या संघर्षातून तालिबान आपले इरादे पूर्ण करण्यासाठी सक्रिय असल्याचे दिसून आले. तालिबानने अफगाणिस्तानमधील कंदाहार, नांगरहार, बल्क, फरयाब, घोर, बदघीस, हेरात, गझनी व उरुझगन प्रांतात मोठे हल्ले चढविल्याची माहिती लष्कराने दिली. याव्यतिरिक्त इतर नऊ प्रांतातही दहशतवादी हल्ल्यांची नोंद झाल्याचे सांगण्यात आले. कंदाहार प्रांतात झालेल्या हल्ल्यात अफगाणी लष्कराने सहा तालिबानी दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा केला. तर नांगरहार प्रांताच्या शेरझाद जिल्ह्यात झालेल्या चकमकीमध्ये किमान १३ दहशतवादी मारले गेल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शांतीचर्चा सुरू झाल्यानंतर तालिबानने सुरू केलेले हे हल्ले आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न असू शकतो, असा दावा अफगाण सरकारशी निगाडीत सूत्रांकडून करण्यात आला आहे.

leave a reply