कोरोनाच्या साथीबाबत पुढील चार आठवडे अतिशय आव्हानात्मक

- केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण

नवी दिल्ली – देशात कोरोनाची साथीची तीव्रता प्रचंड वाढली आहे. पुढील चार आठवडे यादृष्टीने अतिशय आव्हानात्मक असणार आहेत, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटले आहे. दुसर्‍या लाटेत कोरोनाचे वाढलेले संक्रमण थोपविण्यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा असणार आहे यावर जोर देताना कोरोनाबाबतच्या गाईडलाईन्सचे पालन करण्याचे आवाहन केंद्रिय आरोग्य सचिवांनी केले.

देशात कोरोनाचे रुग्ण भरमसाठ वेगाने वाढत आहेत. हा वेग पहिल्या लाटेपेक्षाही जास्त आहे. काही राज्यामध्ये तर स्थिती इतर राज्यांपेक्षाही खूपच बिकट आहे. या राज्यांसह देशभरात कोरोनाच्या रुग्णात वाढ दिसून येत आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. ही दूसरी लाट थोपविण्यात जनतेचा सहभाग महत्त्चाचा ठरणार आहे. सर्वांनी मिळून आणि एकत्रित प्रयत्नाने या महासाथीचा सामना करावा लागेल. या साथीविरोधात लढण्याची शस्त्रे पूर्वीचीच आहेत. मास्क घालणे, गर्दींच्या ठिकाणापासून दूर राहणे, सोशल डिस्टंन्सिंग पाळणे, कंन्टेंन्मेंट झोन बनविणे, मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग करणे, वैद्यकीय सुविधा बळकट करणे आणि लसीकरणाचा वेग वाढविणे या बाबींची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी लागेल, असे केंद्रिय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले.

आठवड्यापासून दरदिवशी आढळणार्‍या कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा ९० हजारांच्या पुढे पोहोचली आहे. असे असले, तरी या साथीने होणारा मृत्युदर जगात भारतात सर्वात कमी आहे. दहा लाख जनसंख्येमागे अमेरिका, मेक्सिको, फ्रान्समध्ये अनुक्रमे १६००, १५००, १४०० जण कोरोनाच्या साथीने दगावत आहेत. भारतात हेच प्रमाण १२० जण इतका आहे, अशी माहिती भूषण यांनी दिली.

देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत असलेल्या १० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील सात, कर्नाटकातील एक, छत्तीसगडमधील एक आणि दिल्लीचा समावेश आहे. तसेच पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, बंगळुरू शहर, औरंगाबाद, अहमदनगर, दिल्ली आणि दुर्ग असे हे दहा जिल्हे आहेत. महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगडमध्ये सर्वात जास्त चिंताजनक स्थिती असल्याचे भूषण यांनी सांगितले.

leave a reply