नायजरमध्ये सरकारविरोधात बंडखोरीचा डाव उधळला

निमाये – नायजरचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बझूम यांच्या विरोधात लष्करातील गटाने आखलेले बंड स्पेशल पथकाने उधळले. बंडखोर जवानांनी राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावर गोळीबार केला होता. या हल्ल्यात जीवितहानी झाली नसून बंडखोर जवानांना ताब्यात घेतल्याचे नायजरच्या सरकारने जाहीर केले.

नायजरमधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत महमू इसोफू यांच्यावर विजय मिळविणारे बझूम येत्या शुक्रवारी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार होते. पण त्याआधी बुधवारी पहाटे लष्करातील एका गटाने नव्या राष्ट्राध्यक्षांविरोधातच बंड पुकारले. या बंडखोर जवानांनी राजधानी निमायेतील राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावर हल्ला चढविला. १५ ते २० मिनिटे हा संघर्ष सुरू होता, असे स्थानिकांनी म्हटले आहे. राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षा रक्षकांनी हे बंड उधळून काही बंडखोर जवानांना ताब्यातही घेतले. या बंडखोरीमागील सूत्रधारांचा तपास सुरू आहे.

बझूम हे विद्यमान राष्ट्राध्यक्ष इसोफू यांच्या सरकारमध्ये अंतर्गत सुरक्षामंत्री होते. त्यांच्या निवडीचे फ्रान्स तसेच इतर देशांनी स्वागत केले होते. पण बझूम यांच्या विरोधात लढणारे माजी राष्ट्राध्यक्ष मुहमाने उस्माने यांनी आपणच विजेते असल्याचे दावे केले होते. तसेच बझूम यांच्याविरोधात आंदोलन पुकारण्याची घोषणा केली होती. त्यामुळे उस्माने यांच्या समर्थकांनी हे बंड घडविल्याची शक्यता वर्तविण्यात येते. आफ्रिकेच्या साहेल प्रांतात येणारा नायजर हा जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक मानला जातो. नायजरची लोकसंख्या सव्वा तीन कोटीच्या पुढे असून सकल राष्ट्रीय उत्पादन १३ अब्ज डॉलर्सच्या जवळ आहे. या देशातील ४० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या दारिद्य्ररेषेखाली असल्याची माहिती याआधी प्रसिद्ध झाली होती.

नायजर हा युरेनियम उत्पादकतेत जगातील चौथ्या क्रमांकाचा देश आहे. तसेच या देशात इंधन आणि सोन्याच्या खाणी देखील आहेत. तरीही राजकीय अस्थैर्य आणि दहशतवादामुळे या देशाची प्रगती होऊ शकलेली नाही. बोको हराम या दहशतवादी संघटनेच्या हल्ल्यांनी या देशाला हादरवून सोडले आहे. काही दिवसांपूर्वीच या दहशतवादी संघटनेने माली जवळच्या सीमाभागात केलेल्या हल्ल्यांमध्ये १३७ जणांचा बळी गेला होता.

leave a reply