पश्चिम बंगाल आणि केरळामधून ‘अल कायदा’च्या नऊ दहशतवाद्यांना अटक

'एनआयए'ने दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला

नवी दिल्ली – राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) केरळ व पश्चिम बंगालमध्ये धाडी टाकून अल-कायदाशी संबंधित नऊ दहशतवाद्यांची धरपकड केली आहे. हे दहशतवादी भारतात मोठा दहशतवादी हल्ला घडविण्याची योजना आखत होते. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्र, स्फोटके, इलेक्ट्रॉनिक डिवाइस आणि काही बंदी घातलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच दहशतवादी सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानातील हस्तकांशी संपर्कात होते, अशी माहितीही उघड होत आहे.

अल कायदा

पाकिस्तानकडून मिळणारे सहाय्यावर भारतात दहशतवादी मॉड्युल्स मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातील एक मॉड्युल ‘एनआयए’ने उद्ध्वस्त केले आहे. यामुळे मोठा हल्ला उधळला गेला आहे. ‘एनआयए’ने पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये आणि केरलाच्या एर्नाकुलममध्ये छापे टाकून नऊ जणांना अटक केली आहे. हे दहशतवादी देशात विविध ठिकाणी मोठा हल्ला घडवण्याचा तयारीत होते अशी माहिती समोर येत आहे.

या मॉड्युलचा म्होरक्या अबू सुफियान याला मुर्शिदाबादमधून ताब्यात घेण्यात आले आहे. नजमुस शकिब, मौनु मोंडल, लेवू इयान अहमद, अल मौमून कमाल, अतितुर रहमान, अशी मुर्शिदाबादमधून अटक करण्यात आलेल्या इतर दहशतवाद्यांची नावे आहेत. तसेच मुर्शिद हसन, याकूब बिश्वास, मोसरफ हसन या तिघा दहशतवाद्यांना एर्नाकुलममध्ये अटक करण्यात आली.

दहशतवादी दिल्लीत शस्त्र आणि दारूगोळा खरेदी करण्यासाठी येणार होते. तसेच काश्मीरमध्ये ही शस्त्र पोहोचवण्यात येणार होती अशी माहिती एनआयएच्या सूत्रांनी दिली. पाकिस्तानच्या सहाय्यावर चालणारे अल-कायदा मॉड्युल भारतात विविध ठिकाणी हल्ला घडविण्याच्या तयारीत असल्याची माहिती ‘एनआयए’ला मिळाली होती. त्यानुसार ११ सप्टेंबर रोजी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.

leave a reply