अन्यथा परिस्थिती पुन्हा बिघडू शकते – कोरोनाच्या नव्या व्हेरियंटवरून नीति आयोगाच्या डॉ. पॉल यांचा इशारा

नवी दिल्ली – देेशात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या ९ लाखांपर्यंत खाली आली असून सध्या २० राज्यांमध्ये पाच हजाराहून कमी सक्रीय रुग्ण आहेत. देशभरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असल्याची दिलासादायक आकडेवारी येत असताना नीति आयोग व केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सावधानतेचा इशारा दिला आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटपासून निर्माण झालेला डेल्टा प्लस हा स्ट्रेन आढळल्याचे नुकतेच समोर आले होते. या व्हेरियंटची लागण झालेले फारसे रुग्ण आढळलेले नाहीत. त्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण कोरोनाचा नवा व्हेरियंट जास्त चलाख असून नियम न पाळल्यास परिस्थिती पुन्हा बिघडू शकते असा इशारा नीति आयोगाचे सदस्य डॉ.व्हि.के.पॉल यांनी दिला आहे.

डॉ. पॉलदेशात चोवीस तासात कोरोनाच्या ६० हजार ४७१ नव्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या ७५ दिवसात चोवीस तासात आढळलेले कोरोनाचे हे सर्वात कमी रूग्ण आहेत. ७ मे नंतर सतत कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तर गेल्या महिनाभरापासून बरे होणार्‍या रुग्णांची संख्या नव्या रुग्णांपेक्षा वाढली आहे. त्यामुळे ऍक्टिव्ह केसेस झपाट्याने कमी होत आहेत. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात १ लाख १७ हजार रुग्ण बरे झाले. यामुळे ऍक्टिव्ह केसेसची संख्या घटून ९ लाखांपर्यंत खाली आली. देशभरातून कोरोनाची लाट ओसरत असताना आता कोरोनाच्या नव्या व्हेरियंटवरून नीति आयोग व आरोग्य मंत्रालयाने इशाारा दिला आहे.

कोरोनाचा डेल्टा प्लस हा व्हेरियंट विविध देशात आढळला आहे. अमेरिका, ब्रिटन व युरोपिय देशातही याचे रुग्ण आढळले आहेत. तसेच भारतातही आतापर्यंत सहा रुग्णांची नोंद झाली आहे. या व्हेरियंटने संक्रमितांची संख्या खूपच कमी असल्याने सध्या तरी कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनला घेऊन घाबरून जाण्याचे कारण नाही, असे तज्ज्ञांचे स्पष्ट म्हणणे आहे.

पण मंगळवारी नीति अयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही.के.पॉल यांनी सावधानतेचा इशारा दिला. कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंट हा डेल्टा व्हेरियंटपेक्षा अधिक चलाख बनला आहे. मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेललाही डेल्टा प्लस दाद देत नसल्याचे समोर आले आहे. याबाबत अधिक अभ्यास केला जात आहे, असे पॉल म्हणाले. मात्र आपल्याला अधिक सावध राहवे लागेल. मास्क लावणे, सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करणे यासारखे नियम काटेकारेपणे पाळावे लागतील. हे नियम पाळले नाहीत, तर परिस्थिती पुन्हा बिघडण्याचा धोका आहे, असा इशारा डॉ.पॉल यांनी केला.

leave a reply