रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात बदल नाही

मुंबई – रिझर्व्ह बँकेने आपले द्विमाही पतधोरण बुधवारी जाहीर केले. देेशात कोरोनाच्या साथीने पुन्हा भयंकर रूप घेतले असताना, तसेच महागाईत वाढ झाली असताना ‘आरबीआय’कडून पतधोरणात काय निर्णय घेतले जातात, याकडे लक्ष लागले होते. आरबीआयने बाजाराच्या अपेक्षेनुसार व्याजदरात कोणताही बदल केला नाही. तसेच १ लाख रुपयांचे सरकारी बॉण्ड या तिमाहीत खुल्या बाजारातून खरेदी करण्याची घोषणाही आरबीआयने केली. याशिवाय पेमेंट बँकांमधील खात्यांमधील शिल्लकीची मर्यादा वाढविण्यात आली आहे. ‘आरबीआय’च्या या निर्णयांमुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांमध्ये मोठो उत्साह दिसून आला. मुंबई सेन्सेक्स ६०० अंकांनी उसळला. यामुळे गुंतवणूकदारांना सुमारे दोन लाख कोटी रुपयांचा लाभ झाला आहे.

Advertisement

गेल्यावर्षी कोरोनाच्या साथीत आरबीआयने व्याजदर घटविण्याचे निर्णय घेतले होते. तसेच गेल्या दोन पतधोरणात व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अर्थव्यवस्था सावरली असून आर्थिक व्यवहार पुन्हा पुर्ववत झाल्याने यावर्षात देेशाच्या विकासदरात मोठी वाढ होईल, अशी अपेक्षा जवळजवळ सर्वच तज्ज्ञ व पतमानांकन संस्था करीत आहेत. मात्र त्यामध्ये देशात आलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने पुन्हा एकदा आव्हान उभे केले आहे. तसेच वाढलेले इंधन दर व इतर महागाईचे आव्हानही आहे. या पार्श्‍वभूमीवर आरबीआय पतधोरणात काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले होते.

बुधवारी ‘आरबीआय’चे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी नव्या पतधोरणाची घोषणा केली. यानुसार रेपो रेट ४ टक्के इतका कायम ठेवला आहे. त्यामुळे कर्जदरांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्याच्या महागााई दरावर ‘आरबीआय’ गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी चिंता व्यक्त केल्या. येत्या मान्सूनवर अन्नधान्याच्या किंमती अवलंबून राहतील. २०२१-२२ च्या पूण सालात महागाई दर ४.४-५.२ च्या दरम्यान राहील, असा अंदाज गव्हर्नर दास यांनी वर्तविला. तसेच या आर्थिक वर्षात विकासदर १०.५ टक्के राहील अशी शक्यताही दास यांनी वर्तविली.

सध्याच्या स्थितीती पहिल्या कोरोना लाटेदरम्यान कर्जदारांना देण्यात आलेली लोन मोरॅटोरियमची सुविधा देण्याची आवश्यकता दिसत नाही, असेही दास यांनी स्पष्ट केले. कोरोना काळात अर्थव्यवस्थेला बळ देण्याकरीता खुल्या बाजारातून एक लाख कोटी रुपयांचे सरकारी बॉण्ड खरेदी करण्याचा निर्णयही आरबीआयने जाहीर केला.

या सर्व निर्णयाचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. बँकींग क्षेत्रामध्ये मोठी उसळी दिसून आली. एसबीआय, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, आयडीएफसी बँकेचे शेअर वधारले. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती या वाहन क्षेत्रातील कंपन्यांसह इन्फोसिस, डॉ. रेड्डीज लॅब, एशियन पेंट या प्रमुख कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. मुंबई सेन्सेक्स ६६० आणि निफ्टी निर्देशांक १८० अंकांनी वधारला.

leave a reply