तालिबानला चर्चा करण्यास भाग पाडणाऱ्या पाकिस्तानकडे कुणीही दुर्लक्ष करू शकणार नाही

- पाकिस्तानच्या मंत्र्यांचा दावा

इस्लामाबाद – अमेरिकेबरोबर चर्चा करण्यासाठी तालिबानला भाग पाडणाऱ्या पाकिस्तानकडे कुणीही दुर्लक्ष करू शकत नाही, असा दावा पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षामंत्री शेख रशिद यांनी केला आहे. यामुळे अफगाणिस्तानात तालिबानची राजवट येत असताना, पाकिस्तान आपले महत्त्व वाढविण्याच्या प्रयत्नात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. सध्या तालिबानच्या विजयावर पाकिस्तानात जल्लोष सुरू असून आता आपल्या देशाचा सुवर्णकाळ सुरू होईल, असा विश्‍वास या देशातील कट्टरपंथियांना वाटू लागला आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानवर सत्ता प्रस्थापित केल्यानंतर तालिबान भारताच्या तावडीतून काश्‍मीर मुक्त करतील, अशी स्वप्ने हे कट्टरपंथिय पाहत आहेत.

तालिबानला चर्चा करण्यास भाग पाडणाऱ्या पाकिस्तानकडे कुणीही दुर्लक्ष करू शकणार नाही - पाकिस्तानच्या मंत्र्यांचा दावातालिबानला अमेरिकेशी चर्चा करण्यास पाकिस्ताननेच भाग पाडले, असा दावा शेख रशिद यांनी केला. मात्र सध्या अमेरिका व तालिबानमध्ये झालेल्या कराराचे पालन करण्यासाठी तालिबान उत्सुक नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. अल कायदा व इतर दहशतवादी संघटनांबरोबरील तालिबानचे संबंध संपलेले नाहीत. ही प्रमुख अट अमेरिकेने तालिबानसमोर ठेवली होती. त्यामुळे तालिबानबरोबर झालेल्या कराराला आता अर्थ उरलेला नसल्याची टीका अमेरिकेत सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे नेते सदर कराराचे श्रेय आपल्या देशाला मिळावे, यासाठी धडपडत आहेत. मात्र कराराचे श्रेय घेतले, तर करार मोडण्याचे खापर देखील पाकिस्तानच्याच शीरावर फोडले जाईल, अशी चिंता पाकिस्तानी माध्यमे व्यक्त करीत आहेत.

अफगाणिस्तानात अमेरिकेचा पराभव झाला, तो पाकिस्तानने तालिबानला केलेल्या सहाय्यामुळेच, असे दावे पाकिस्तानातील कट्टरपंथिया ठोकत आहेत. पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना ‘आयएसआय’चे माजी प्रमुख हमीद गुल यांनी काही वर्षांपूर्वी ‘पाकिस्तान अमेरिकेच्या मदतीनेच अमेरिकेला अफगाणिस्तानात पराभूत करील’ असे लक्षवेधून घेणारे विधान केले होते. त्याचा दाखला देऊन अमेरिकेचा पराजय हा पाकिस्ताननेच घडवून आणल्याचे दावे कट्टरपंथियांकडून केले जात आहेत. ही बाब अमेरिकेच्या नजरेतून निसटणार नाही. सध्या अफगाणिस्तानातील माघारीमुळे आपल्यावर होत असलेल्या टीकेमुळे बायडेन प्रशासन अस्वस्थ झाले आहे. अशा काळात पाकिस्तानात सुरू असलेला जल्लोष घातक ठरेल, असा इशारा पाकिस्तानी वंशाच्या अमेरिकेतील राजकीय कार्यकर्त्याने दिला आहे.

पुढच्या काळात अमेरिका पाकिस्तानवर कडक निर्बंध लादू शकेल, असे अमेरिकेतील या राजकीय कार्यकर्त्याने म्हटले आहे. अमेरिकन सिनेटच्या आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीने अफागणिस्तानात आलेल्या अपयशाची चौकशी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पाकिस्तानने केलेला विश्‍वासघातच अफगाणिस्तानातील परिस्थितीला जबाबदार असल्याचा ठपका आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीचे अध्यक्ष जॅक रिड यांनी नुकताच ठेवला होता. त्यामुळे पाकिस्तानला अमेरिकेच्या कारवाईचा सामना करावा लागेल, असे स्पष्टपणे दिसू लागले आहे. शेख रशिद यांच्यासारखे पाकिस्तानी नेते या कारवाईचा मार्ग अधिक प्रशस्त करीत असल्याचे दिसते.

leave a reply