उत्तर कोरियाकडून जपानच्या समुद्रात बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण

- जपान, दक्षिण कोरिया व अमेरिकेची टीका

सेऊल – उत्तर कोरियाने मंगळवारी प्रक्षेपित केलेले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र ‘सी ऑफ जपान’मध्ये कोसळले. उत्तर कोरियाने पाणबुडीतून सदर क्षेपणास्त्र प्रक्षेपित केल्याचा दावा दक्षिण कोरियन लष्कराने केला. जपानच्या सागरी क्षेत्राजवळ क्षेपणास्त्र डागणार्‍या उत्तर कोरियावर जपानसह दक्षिण कोरिया व अमेरिकेने ताशेरे ओढले आहेत. गेल्या महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघाने आयोजित केलेली महासभा सुरू असताना उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. याद्वारे उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जॉंग उन जगाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.

उत्तर कोरियाकडून जपानच्या समुद्रात बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण - जपान, दक्षिण कोरिया व अमेरिकेची टीकाआपल्याकडे जगातील सर्वात सामर्थ्यशाली शस्त्र असल्याचा दावा उत्तर कोरियाने जानेवारी महिन्यात केला होता. त्यावेळी उत्तर कोरियाने पाणबुडीतून प्रक्षेपित केल्या जाणार्‍या क्षेपणास्त्राची माहिती जगासमोर प्रसिद्ध केली होती. त्यानंतर उत्तर कोरियाने ठराविक कालावधीच्या अंतराने क्षेपणास्त्रांची चाचणी सुरू ठेवली आहे. पण गेल्या दीड महिन्यांमध्ये उत्तर कोरियाच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे. यातील काही चाचण्या आंतरराष्ट्रीय निर्बंधांचे उल्लंघन करणार्‍या तर दक्षिण कोरिया व जपानच्या सुरक्षेला धोका पोहोचविणार्‍या ठरल्या आहेत.

मंगळवारी देखील उत्तर कोरियाने सिंपो बंदरातून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले. सिंपो बंदरात उत्तर कोरियाच्या पाणबुड्या तैनात असतात. त्यामुळे उत्तर कोरियाने पाणबुडीतून सदर क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याचा दावा दक्षिण कोरियन लष्कराने केला. सदर क्षेपणास्त्राने ६० किलोमीटर उंची गाठून ४५० किलोमीटर अंतरावर सी ऑफ जपानमध्ये कोसळले. सदर क्षेपणास्त्र जपानच्या अधिकृत हद्दीत कोसळले नसले तरी ही चाचणी अतिशय निंदनीय असल्याचे जपानने म्हटले आहे.

उत्तर कोरिया पाणबुडीतून क्षेपणास्त्राची चाचणी घेऊन दक्षिण कोरियासह जपान व अमेरिकेला इशारा देत असल्याचा दावा केला जातो. याआधी २०१९ साली उत्तर कोरियाने पुगूक्सॉंग-३ या क्षेपणास्त्राचे पाण्याखालून प्रक्षेपण केले होते. या क्षेपणास्त्राची चाचणी उत्तर कोरियासह जपानला मापणारी होती, असा इशारा अमेरिकेच्या यंत्रणांनी त्यावेळी दिला होता.

leave a reply