अमेरिका व दक्षिण कोरियाच्या संयुक्त युद्धसरावावरून उत्तर कोरियाचा इशारा

उत्तर कोरियाचा इशाराप्योनग्यँग/सेऊल – दक्षिण कोरिया चिथावणी देणारा युद्धसराव करतो की एखादा धाडसी निर्णय घेतो, यावर उत्तर कोरियाचे सरकार व लष्कर बारीक लक्ष ठेऊन आहे, असा इशारा उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जाँग उन यांची बहीण किम यो जाँग यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वीच उत्तर व दक्षिण कोरियाने दोन देशांमधील संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये बैठक होण्याचे संकेतही देण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर किम यो जाँग यांनी यांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

गेल्या वर्षी जून महिन्यात उत्तर कोरियाने दोन देशांमधील संबंध सुधारण्यासाठी स्थापन केलेले राजनैतिक कार्यालय बॉम्बस्फोटात उडवून दिले होते. त्यानंतर उत्तर कोरियाने दोन देशांमधील संपर्क तोडून लष्करी व आण्विक हालचालींना वेग दिला होता. गेल्या काही महिन्यात उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जाँग उन यांनी चीनबरोबरील सहकार्य अधिक वाढविण्याचे प्रयत्नही सुरू केले होते. या सर्व हालचाली दक्षिण कोरिया व अमेरिकेवर दडपण आणण्यासाठी असल्याचे सांगण्यात येते.

उत्तर कोरियाचा इशारादडपण टाकण्याचे प्रयत्न सुरू असतानाच काही दिवसांपूर्वी उत्तर व दक्षिण कोरियाने पुन्हा परस्परांमधील संपर्क स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. उत्तर कोरिया पुन्हा संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे संकेत यातून गेले होते. मात्र हे संकेत देतानाच, अमेरिका व दक्षिण कोरियाच्या सरावाच्या मुद्यावरील भूमिका बदलली नसल्याचे किम यो जाँग यांच्या इशार्‍यावरून दिसून येते. ‘गेले काही दिवस मी पुन्हा अमेरिका व दक्षिण कोरियाच्या लष्करामध्ये होणार्‍या संयुक्त सरावाबद्दलची वृत्ते पहात आहे. हा सराव नियोजित वेळेनुसारच होणार असल्याचे सांगण्यात येते. उत्तर व दक्षिण कोरियाचे सर्वोच्च नेतृत्त्व परस्परांमध्ये विश्‍वास निर्माण करण्यासाठी पावले उचलत आहे. अशा वेळी हा सराव सर्व काही बिघडविणारा व प्रयत्न कमकुवत करणारा ठरु शकतो. यामुळे उत्तर व दक्षिण कोरियाच्या संबंधांवरही परिणाम होऊ शकतो’, असा इशारा किम यो जाँग यांनी दिला.

चिथावणी देणारा युद्धसराव व धाडसी निर्णय यापैकी दक्षिण कोरिया कोणता पर्याय निवडते यावर उत्तर कोरियाचे सरकार व लष्कर बारीक लक्ष ठेऊन आहे, असेही त्यांनी पुढे बजावले. यापूर्वी मार्च महिन्यात अमेरिका व दक्षिण कोरियामध्ये झालेल्या सरावाच्या पार्श्‍वभूमीवरही किम यो जाँग यांनी अमेरिकेला धमकावले होते. यावेळी दक्षिण कोरियाला धमकावून त्या माध्यमातून अमेरिकेवर दडपण टाकण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. दक्षिण कोरियातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी अमेरिकेबरोबर सराव रद्द करण्याची शक्यता फेटाळली आहे. सरावाची व्याप्ती व इतर गोष्टींमध्ये बदल होऊ शकतो, पण सराव रद्द होणार नाही असे दक्षिण कोरियाने बजावले आहे.

दरम्यान, ब्रिटनकडून इंडो-पॅसिफिकमध्ये दोन युद्धनौका तैनात करण्याच्या निर्णयावर उत्तर कोरियाने टीकास्त्र सोडले आहे. ब्रिटनचा निर्णय चिथावणीखोर असल्याचे उत्तर कोरियाच्या वरिष्ठ अधिकार्‍याने म्हटले आहे. ‘ब्रिटन उत्तर कोरियाच्या धोक्याचे कारण पुढे करून त्यांच्या तैनातीच्या निर्णयाचे समर्थन करीत आहे. याला या क्षेत्रातील देशांकडून तीव्र प्रत्युत्तर मिळेल व इथला तणाव अधिकच चिघळेल’, असा दावा उत्तर कोरियाच्या अधिकार्‍यांनी केला आहे.

leave a reply