प्रत्येकाला कोरोना लसीची आवश्यकता नाही

- केंद्रीय आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली – कोरोनाची लस कधी येणार याकडे सार्‍यांचेच लक्ष लागले असताना ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’चे (आयसीएमआर) अध्यक्ष बलराम भार्गवा यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. कोरोनाची साखळी तोडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. लस आल्यावर जास्त धोका असलेल्यांचे लसीकरण करून ही साखळी तोडण्यास आपण यशस्वी ठरलो, तर प्रत्येकाला ही लस देण्याची आवश्यकता नसेल, असा दावा भार्गवा यांनी केला. यावेळी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषणही उपस्थित होते. केंद्र सरकारने देशातील सर्वांना लस देणार असे कधीही म्हटलेले नाही, याकडे भूषण यांनी लक्ष वेधले.

लसीची आवश्यकता

देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ९४ लाख ६२ हजारांच्या पुढे गेली आहे. तसेच देशात या साथीत बळी गेलेल्यांची संख्या १ लाख ३७ हजारांवर पोहोचली आहे. मंगळवारी देशात ३१ हजार नव्या रुग्णांची नोेद झाली. तसेच चोवीस तासात ४८२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले असून कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर ९३.९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापयर्र्त या साथीची लागण झालेले ८८ लाख ८९ हजार जण बरे झाले आहेत. मात्र काही राज्यांमध्ये पुन्हा रुग्ण वाढण्याचा धोका कायम आहे.

या पार्श्‍वभूमीवर सर्वांचे डोळे कोरोना लस कधी येते याकडे लागले आहेत. नुकतीच पंतप्रधान मोदी यांनी कोरोना लस विकसित करणार्‍या तीन संस्थांच्या प्रयोगशाळेला भेट दिली होती व लसीशी संबंधीत प्रगतीबाबत आढावा घेतला होता. मार्च महिन्यार्पंत लस येऊ शकते, असे दावे केले जात आहेत. मंगळवारी आरोग्य मंत्रालयाकडून पत्रकारांशी संवाद साधला जात असताना सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी किती वेळ लागेल, असा प्रश्‍न विचारण्यात आला. यावर आरोग्य मंत्रालयाने मोठं विधान केलं आहे.

देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण शक्य नाही आणि त्याची गरजही नाही, असे केंद्रीय अरोग्य सचिव राजेश भूषण यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. केंद्र सरकारने आतापर्यंत कधीही सर्वांचे लसीकरण करण्यात येईल, असे म्हटलेले नाही. या संबंधी वैज्ञानिक मुद्यांवर तथ्यात्मक माहितीच्या आधारे चर्चा करणे महत्त्वाचे आहे, असे भूषण म्हणाले.

‘आयसीएमआर’चे अध्यक्ष बलराम भार्गवा यांनी यासंबंधी अधिक खुलासा केला. कोरोनाची साखळी तोडण्याला प्राधान्य आहे. ही साखळी तुटली तर सर्वांनाच लस देण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे लस आल्यानंतर कोरोनाची लागण होण्याचा जास्त धोका असलेल्यांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात येईल. जास्तीत जास्त लसीकरणामुळे एकदा का कोरोनाची साखळी तुटली की सर्वाना लस देण्याची आवश्यकता भासणार नाही, असे ‘आयसीएमआर’चे अध्यक्ष भार्गवा यांनी स्पष्ट केले.

leave a reply