ब्राझिलमध्ये कोरोनाच्या बळींची संख्या सहा लाखांवर पोहोचली

ब्राझिलमध्येरिओ दि जानिरो – ब्राझिलमध्ये कोरोनाच्या साथीत बळी गेलेल्यांची संख्या सहा लाखांवर गेली आहे. कोरोनाचे सर्वाधिक बळी जाणार्‍या देशांमध्ये ब्राझिल दुसर्‍या क्रमांकाचा देश ठरला आहे. कोरोनाच्या साथीत इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या जीवितहानीसाठी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो व त्यांचे सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्ष तसेच स्वयंसेवी गटांकडून करण्यात येत आहे. ब्राझिलसह लॅटिन अमेरिकेतील बळींची संख्याही वाढत असून या खंडातील बळींची संख्या १५ लाखांवर पोहोचली आहे.

२०१९ सालाच्या अखेरीस चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीने गेल्या दीड वर्षात जगभरात हाहाकार उडविला आहे. जगभरातील २०० हून अधिक देशांमध्ये फैलावलेल्या या साथीची २३.७ कोटींहून अधिक जणांना लागण झाली असून ४८ लाखांहून अधिक दगावले आहेत. अमेरिकेत सर्वाधिक सात लाख जणांचा बळी गेला असून त्यापाठोपाठ ब्राझिलचा क्रमांक लागला आहे. ब्राझिलमधील बळींची संख्या सहा लाखांवर गेल्याचे शुक्रवारी जाहीर करण्यात आले. ब्राझिलमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या २.१५ कोटींवर गेल्याचेही सांगण्यात आले.

ब्राझिलमध्ये दररोज आढळणार्‍या रुग्णांची सरासरी १५ हजारांच्या आसपास असून बळींची संख्याही ५००पर्यंत खाली आल्याची माहिती स्थानिक अधिकार्‍यांनी दिली. डेल्टा व्हेरिअंटचा उद्रेक कायम असतानाही रुग्ण तसेच बळींची संख्या घटत असल्याचे समोर येत आहे. यामागे गेल्या दोन महिन्यात वाढलेला लसीकरणाचा वेग हे प्रमुख ब्राझिलमध्येकारण ठरल्याचे उघड झाले आहे. ब्राझिलमध्ये ७० टक्क्यांहून अधिक नागरिकांनी किमान एक लस घेतली असून ४५ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ६५ वर्षांवरील नागरिकांना ‘बूस्टर डोस’ देण्यास सुरुवात झाल्याचेही सांगण्यात येते.

मात्र असे असले तरी सुमारे २१ कोटी लोकसंख्या असलेल्या ब्राझिलमध्ये कोरोनाच्या मुद्यावरून सरकारविरोधात असलेली नाराजी कायम आहे. राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांनी सुरुवातीपासून सोशल डिस्टंसिंग, मास्क व लॉकडाऊन यासारख्या गोष्टींना विरोध केला होता. लसीकरण मोहीम सुरू होण्यासाठीही बराच उशिर झाला. त्यामुळे ब्राझिलमध्ये रुग्ण व बळींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतो. या मुद्यावरून राष्ट्राध्यक्षांविरोधात तीव्र आंदोलनही सुरू झाले आहे.

दरम्यान, ब्राझिलपाठोपाठ लॅटिन अमेरिकेतील इतर देशांनाही कोरोनाचा मोठा फटका बसल्याचे समोर आले होते. त्यामुळे लॅटिन अमेरिकेतील बळींची संख्या वाढल्याचे वृत्त समोर आले आहे. लॅटिन अमेरिकेत कोरोनामुळे सुमारे १५ लाख जण दगावल्याची माहिती समोर आली आहे. सर्वाधिक बळी जाणार्‍या देशांमध्ये ब्राझिलपाठोपाठ पेरु, कोलंबिया व अर्जेंटिना या देशांचा समावेश आहे. पेरुमधील बळींची संख्या सुमारे दोन लाख असून कोलंबिया व अर्जेंटिनामध्ये एक लाखाहून अधिक बळींची नोंद झाली आहे.

leave a reply