जगभरातील कोरोनाच्या बळींची संख्या अधिकृत नोंदीपेक्षा दुपटीहून अधिक

- अमेरिकी अभ्यासगटाचा दावा

बळींची संख्यावॉशिंग्टन – जगभरात कोरोनाच्या साथीमुळे बळी गेलेल्यांची संख्या सध्याच्या अधिकृत जाहीर नोंदीपेक्षा दुपटीहून अधिक असल्याचा दावा अमेरिकी अभ्यासगटाने केला आहे. ‘इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मॅट्रिक्स ऍण्ड इव्हॅल्युएशन’ (आयएचएमई) या गटाने नुकत्याच सादर केलेल्या अहवालानुसार, जगभरातील कोरोना बळींची संख्या तब्बल ६९ लाखांच्या जवळपास आहे. विविध देशांमधील अधिकृत नोंदींनुसार, कोरोनामुळे दगावणार्‍यांची संख्या ३२.५ लाख असल्याचे सांगण्यात येत आहे.

‘आयएचएमई’चे संचालक डॉक्टर ख्रिस्तोफर मरे यांनी गुरुवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध करून अहवालाची माहिती दिली. कोरोनाची साथ असलेल्या देशांमध्ये अजूनही पुरेशा प्रमाणात चाचण्या होत नसल्याने कोरोनामुळे जाणार्‍या बळींची संख्या कमी दिसत असल्याचे डॉ. मरे यांनी यावेळी सांगितले. बहुतांश प्रमुख देशांमध्ये रुग्णालयात दाखल झालेले कोरोनाचे रुग्ण किंवा ज्यांची चाचणी झाली आहे अशा व्यक्ती यांचीच कोरोनाच्या बळींमध्ये नोंद करण्यात येत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मात्र अधिकृत नोंद न झालेल्या अनेक मृत्यूंमागे कोरोना हे कारण असू शकते, असा दावा ‘आयएचएमई’ने केला आहे.

आपल्या अहवालात ‘आयएचएमई’ने सर्वाधिक बळींची नोंद झालेल्या प्रमुख देशांची नावे व नवी आकडेवारीही प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार एकट्या अमेरिकेत नऊ लाख, ५ हजार जणांचा कोरोनामुळे बळी गेल्याचे सांगण्यात आले आहे. ‘सीडीसी’ या अमेरिकी यंत्रणेच्या माहितीनुसार, सध्या अमेरिकेतील बळींची संख्या पाच लाख, ७५ हजार, ४९१ आहे. ‘आयएचएमई’च्या अहवालावर ‘सीडीसी’ने कोणतीही प्रतिक्रिया नोंदविलेली नाही.

बळींची संख्या‘आयएचएमई’च्या अहवालानुसार, अमेरिकेपाठोपाठ भारत, मेक्सिको, ब्राझिल, रशिया व ब्रिटनमध्ये कोरोनामुळे अधिक प्रमाणात मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. ब्राझिल व रशियामध्ये पाच लाखांहून अधिक जण कोरोनाच्या साथीत दगावल्याचे ‘आयएचएमई’ने म्हटले आहे. ब्रिटनमध्येही कोरोनामुळे दोन लाखांहून अधिक बळी गेल्याची माहिती अहवालात देण्यात आली.

२०१९ सालच्या अखेरीस चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीने जगभरात हाहाकार उडविला आहे. जगभरात १५ कोटींहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. जगातील अनेक प्रमुख देशांमध्ये साथीची दुसरी व तिसरी लाट सुरू आहे. कोरोनाव्हायरसचे नवनवीन ‘स्ट्रेन’ विकसित होत असून त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकी अभ्यासगटाचा अहवाल चिंतेत अधिकच भर टाकणारा ठरला आहे.

leave a reply