देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ६२ हजारांच्यावर

महाराष्ट्रातील रुग्णांच्या संख्येने २० हजारांचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली/मुंबई – देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ६२ हजारांच्या पुढे पोहोचली आहे, तर महाराष्ट्रातील या साथीच्या रुग्णांच्या संख्येने २० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र चाचण्यांमध्ये झालेल्या वाढीमुळे रुग्ण संख्या वाढली असून काही आठवड्यातच देशातील या साथीच्या रुग्णांचा आलेख खाली येईल, असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केला. तसेच १७ मे नंतर लॉकडाऊन वाढवायचा का, हे त्यावेळी विचार करून ठरवले जाईल, असेही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’कडून (आयसीएमआर) कोरोनाचे रुग्ण वाढत असलेल्या देशातील ७५ जिल्ह्यांमध्ये सामुदायिक संसर्ग झाला आहे का, हे तापसण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

देशात शुक्रवारच्या सकाळपासून शनिवारी रात्री ९ वाजेपर्यंत कोरोनाच्या साथीने दगावलेल्यांची संख्या सुमारे २०० ने वाढली असून २,०१६ वर पोहोचली आहे. तर याच काळात सहा हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या ६२,६१३ वर गेली आहे. महाराष्ट्रात शनिवारी दिवसभरात ४८ जणांचा बळी गेला, तर १,१६५ नव्या रुग्णांची नोंद झाली. यातील ७२२ रुग्ण मुंबईतच सापडले आहेत. तसेच ६५२ संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

देशात काही राज्यात व त्यातही काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाचे हॉटस्पॉट असलेले जिल्हे आणि शहरांमध्ये ‘आयसीएमआर’ एक सर्व्हेक्षण हाती घेणार आहे. यासाठी ‘इएलआयएसए’ चाचणी किट्सचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती ‘ आयसीएमआर’च्या अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये गेल्या काही दिवसात झालेली वाढ ही टेस्टिंग वाढविण्यात आल्यामुळे झाली आहे. सध्या दररोज ८० हजारांच्यावर कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. तसेच मे अखेरीपर्यंत दररोज एक लाख चाचण्या होतील, असे आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे. लवकरच देशातच टेस्टिंग कीट्सची मोठया प्रमाणावर निर्मिती होईल. त्यामुळे चीनकडून टेस्टिंग किट्स आयात करण्याची गरज भासणार नाही, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच देशात जून महिन्यात रुग्णांची संख्या शिखरावर पोहोचलेली असेल, या ‘एम्स’चे संचालक रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केलेल्या शक्यतेलाही त्यांनी उत्तर दिले. ‘डॉ. गुलेरिया यांनी हा अंदाज कसा बांधला हे मला ठावूक नाही. मात्र येत्या काही आठवड्यात कोरोनाचा आलेख सपाट होईल आणि तो खालीदेखील येईल, याबाबत आपण आशावादी असल्याचे आरोग्यमंत्री हर्ष वर्धन म्हणाले.

leave a reply