जगभरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४० लाखांवर

बाल्टिमोर/रोम – कोरोनाव्हायरसमुळे गेल्या चोवीस तासात जगभरात पाच हजाराहून अधिक जणांचा बळी गेला असून जगभरात ७० हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे जगभरातील एकूण बळींची संख्या पावणे तीन लाखांच्या जवळ पोहोचली आहे. तर जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या ४०,२७,९६० वर पोहोचली आहे.

जगभरात या साथीने दगावलेल्यांची संख्या २,७६,३९६ वर गेली आहे. यापैकी अमेरिकेत गेल्या चोवीस तासात या साथीमुळे १६३५ जणांचा बळी गेला असून शुक्रवारी या देशात २९,१६२ नव्या रुग्णांची नोंद झाल्याची माहिती जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने दिली. अमेरिकेतील या साथीच्या एकूण बळींची संख्या ७७,१७८ वर गेली आहे. तर अमेरिकेत १३,२२,१६३ कोरोनाग्रस्त आहेत. या साथीचा सर्वाधिक फटका अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला बसला असून रोजगारनिर्मिती ठप्प झाली आहे. म्हणूनच अर्थव्यवस्थेवर आलेल्या या दडपणामुळे ही साथ थैमान घालत असताना देखील अमेरिकेत लॉकडाउन मागे घेण्याची तयारी सुरू झाल्याचे दिसते आहे.

युरोपातील या साथीमुळे १,५०,६५४ जणांचा बळी गेला असून युरोपात कोरोनाचे सुमारे सोळा लाख रुग्ण आहेत. गेल्या चोवीस तासात ब्रिटनमध्ये ६२६ जण या साथीने दगावले असून या देशातील एकूण बळींची संख्या ३१,२४१ वर गेली आहे. तर शुक्रवारी या साथीने इटलीतील २४३ जणांचा बळी घेतला असून या देशातील बळींची संख्या ३०,२०१ वर गेली आहे. या व्यतिरिक्त गेल्या चोवीस तासात स्पेनमध्ये २२९, फ्रान्समध्ये २४३ तर जर्मनीत ५३ जणांचा बळी गेला आहे.

गेल्या चोवीस तासात ब्राझिलमध्ये ७५१ जण या साथीने दगावले असून या देशातील कोरोनाच्या बळींची संख्या दहा हजारांच्या पलिकडे गेली आहे. गेल्या आठवड्याभरात या देशातील कोरोनाच्या बळींच्या आणि कोरोनाग्रस्तांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात ब्राझिलमध्ये १०,२२२ नव्या रुग्णांची नोंद झाली असून या देशात १,४६,८९४ रुग्ण आहेत.

ब्राझिलमध्ये या साथीने शिरकाव केल्यानंतर सरकारने लॉकडाउन करुन वेळीच ही साथ नियंत्रणात ठेवावी, अशी मागणी केली जात होती. मात्र ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सेनारो यांनी त्याला नकार दिला व त्यांच्यामुळे ब्राझिलवर भयंकर परिस्थिती ओढावल्याची टीका केली जात आहे.

leave a reply