जगभरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या सहा कोटींवर

वॉशिंग्टन/लंडन – जगभरात कोरोनाची साथ पुन्हा एकदा वेगाने फैलावत असून एकूण रुग्णांची संख्या सहा कोटींवर जाऊन पोहोचली आहे. या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पाच कोटींवर गेल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या 18 दिवसांच्या कालावधीत रुग्णांच्या संख्येत एक कोटींहून अधिक भर पडली आहे. अमेरिका, युरोप व लॅटिन अमेरिकेत साथीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अमेरिकेत एका आठवड्यात 10 लाखांहून अधिक रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. तर साथीत बळी पडलेल्यांची संख्या दोन लाख, 63 हजारांवर जाऊन पोहोचली आहे.

अमेरिकेतील ‘जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिन’ने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या 6 कोटी, 11 लाख, 16 हजार, 796वर जाऊन पोहोचली आहे. साथीत दगावलेल्यांची एकूण संख्या 14 लाख, 34 हजार, 725 आहे. यात सर्वाधिक बळी अमेरिकेतील असून त्यापाठोपाठ ब्राझिलचा क्रमांक लागतो. सर्वाधिक रुग्णांची नोंद झालेल्या देशांमध्ये अमेरिकेसह चार युरोपिय देश, लॅटिन अमेरिकेतील तीन देश आणि भारत व रशियाचा समावेश आहे. युरोपिय देशांमध्ये फ्रान्स, ब्रिटन, स्पेन व इटलीचा समावेश आहे. तर लॅटिन अमेरिकी देशांमध्ये ब्राझिल, अर्जेंटिना व कोलंबियाचा समावेश आहे.

अमेरिका, युरोप व लॅटिन अमेरिकी देशांमध्ये पुढील काही आठवड्यात साथीचा फैलाव अधिक वाढण्याची भीती वर्तविण्यात आली आहे. ‘थँक्सगिव्हिंग फेस्टिव्हल’च्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकी नागरिकांनी प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासन व आरोग्य यंत्रणांकडून करण्यात आले होते. मात्र ते धुडकावून गेल्या सहा दिवसात तब्बल 60 लाख नागरिकांनी विमानप्रवास केल्याचे समोर आले आहे. त्याचे परिणाम येत्या काही दिवसात दिसण्यास सुरुवात होईल, असा इशारा अमेरिकेतील आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. पुढील काळ आधुनिक अमेरिकेच्या वैद्यकीय इतिहासातील ‘डार्केस्ट डेज्‌’ म्हणून नोंदविला जाईल, असे भाकित टेक्सास प्रांतातील प्रमुख वैद्यक तज्ज्ञ डॉक्टर जोसेफ व्हॅरोन यांनी वर्तविले आहे.

गेल्या आठवड्यात कोरोनाचा सर्वाधिक फटका युरोप खंडाला बसल्याची माहिती ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने (डब्ल्यूएचओ) दिली आहे. मंगळवारी ‘डब्ल्यूएचओ’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, सात दिवसांच्या कालावधीत जगभरात नोंदविण्यात आलेल्या कोरोना रुग्णांपैकी 44 टक्के रुग्ण युरोपिय देशांमध्ये आढळले. तर कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांपैकी 49 टक्के युरोपातील होते, असे ‘डब्ल्यूएचओ’ने सांगितले आहे. या अहवालाच्या पार्श्‍वभूमीवर, ‘डब्ल्यूएचओ’चे विशेष दूत डेव्हिड नॅबारो यांनी, युरोपिय देशांनी चुकांची पुनरावृत्ती केल्यास 2021च्या सुरुवातीला कोरोनाची तिसरी लाट धडकेल असे बजावले आहे. युरोपिय देशांमध्ये आतापर्यंत एक कोटी, 27 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून, बळींची संख्या 3 लाख 11 हजारांवर जाऊन पोहोचली आहे.

दरम्यान, युरोपातील बहुतांश देशांमध्ये पुन्हा एकदा ‘लॉकडाऊन’ची अंमलबजावणी सुरू झाली आहे. युरोपातील आघाडीचा देश असणाऱ्या जर्मनीने जानेवारी 2021च्या सुरुवातीपर्यंत निर्बंध कायम राहू शकतात, असे संकेत दिले आहेत. तर युरोपिय महासंघाच्या प्रमुख ‘उर्सुला व्हॉन डेर लेयन’ यांनी डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात, लसीकरणाची प्रक्रिया सुरू होऊ शकते, असा दावा केला आहे. कोरोनाच्या संभाव्य लसीसाठी महासंघाने आतापर्यंत सहा करार केल्याची माहितीही त्यांनी दिली.

leave a reply