दोन आठवड्यात कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह केसेसच्या संख्येत दहा लाखांची घट

तिसर्‍या लाटेचा मुलांना धोका असल्याचे कोणतेही संकेत नसल्याचेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आले. याबाबत करण्यात येत असलेले दावे निराधार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. काही राज्यांमध्ये अजूनही चिंताजनक परिस्थिती असली व पॉझिटिव्ह रेट जास्त असला तरी दरदिवशी आढळत असलेल्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे समाधानकार चित्र आहे. यामुळे गेल्या दोन आठवड्यात अ‍ॅक्टीव्ह केसेसची संख्या तब्बल 10 लाखांनी कमी झाली आहे. देशातील 197 जिल्ह्यात पॉझिटीव्ह दर हा 5 टक्क्यांच्या खाली गेला आहे. 7 मे रोजी पॉजिटिव्ह रेट 5 टक्क्यांहून कमी असणार्‍या जिल्ह्यांची संख्या केवळ 92 इतकी होती, याकडे कंेंद्रीय आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी अधोरेखित केले आहे. तसेच यावेळी देशात तिसरी लाट असल्यास मुलांसाठी धोका जास्त असेल, हे करण्यात येत असल्याचे दावे, एम्सचे संचालक डॉ. रणदिप गुलेरिया यांनी फेटाळून लावले.

अ‍ॅक्टिव्ह केसेसरविवारपासून सोमवारच्या सकाळपर्यंतच्या चोवीस तासात देशात कोरोनाच्या 2 लाख 22 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या 40 दिवसातील चोवीस तासात आढळलेली ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. मात्र देशात कोरोनाने होणारे मृत्यू कमी झाले नसून चोवीस तासात 4 हजार 454 रुग्ण दगावले आहेत. पण मृत्यूच्या संख्या कमी होण्यासाठी आणखी काही दिवस जावे लागतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

3 मे पर्यंत देशातील कोरोनाचा पॉझिटिव्ह दर 17.18 टक्क्यांवर पोहोचला. काही राज्यांमध्ये हा दर 30 ते 35 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे दिसून आले होते. मात्र सध्या हा पॉझिटीव्ह दर 10.17 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. डब्ल्यूएचओच्या सूचनांनुसार 5 टक्क्यांहून अधिक पॉझिटीव्ह दर धोकादायक आहे. यामुळे अजूनही धोका टळलेला नाही.

पण कित्येक जिल्ह्यांमधून आता परिस्थिती सुधारत असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे. सध्या 197 जिल्ह्यांमध्ये पॉझिटीव्ह दर हा 5 टक्के व त्याहून खाली गेला आहे. 9 मे पासून पॉझिटीव्ह कमी असलेल्या जिल्ह्यांची संख्या शंभरहून अधिकने वाढली आहे. तसेच 105 जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या संक्रमणाच्या बाबतीत स्थिती स्थिर किंवा नियंत्रणात असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव अग्रवाल यांनी म्हटले आहे. सध्या देशात कोरोनाच्या अ‍ॅक्टीव्ह केसेसची संख्या 27 लाख 20 हजारांपर्यंत खाली आली आहे. यापूर्वी ही संख्या 37 लाखांच्या पुढे पोहोचली होती. यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण वाढला होता.

यावेळी एम्सचे संचालक डॉ. गुलेरिया यांनी तिसर्‍या लाटेत मुलांना अधिक धोका असल्याचे करण्यात येत असलेले दावे फेटाळून लावले. तिसर्‍या लाटेत मुलांवर गंभीर परिणाम होतील असे कुठलेही संकेत मिळालेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या साथीच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेमध्ये मुलांना फार कमी संसर्ग झाला आहे, हे आकडेवारीवरून स्पष्ट होईल. त्यामुळे तिसर्‍या लाटेत संसर्गाबाबतचे दावे निराधार असल्याचे पेडियाट्रिक्स असोसिएशनचाच निष्कर्ष असल्याचे डॉ. गुलेरिया यांनी अधोरेखित केले.

दरम्यान, बुरशीचा आजार संसर्गजन्य नसल्याचे डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केले आहे. तसेच या बुरशीच्या संसर्गाला काळा, पांढरा, पिवळ्या अशा रंगाने ओळखण्यापेक्षा नावाने ओळखणे योग्य ठरेल. सोमवारी अ‍ॅस्ट्रॅगलस अर्थात पिवळ्या बुरशीचा पहिला रुग्ण देशात आढळून आला होता.

leave a reply