‘ओएनजीसी’ला कोलंबियामध्ये इंधन तेलाचा मोठा साठा सापडला

नवी दिल्ली – इंधन तेल आणि वायू क्षेत्रातील अग्रगण्य भारतीय कंपनी ‘ऑईल ॲण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन’ला (ओएनजीसी) दक्षिण अमेरिकेतील कोलंबियामध्ये मोठ्या इंधनसाठ्याचा शोध लागला आहे. ‘ओएनजीसी विदेश’ची (ओव्हीएल) कोलंबियातील लालनोसच्या खोऱ्यात ‘सीपीओ-5’ ब्लॉकमध्ये 70 टक्के हिस्सेदारी असून या भागात उत्पखननादरम्यान या इंधनसाठ्याचा शोध लागल्याचे वृत्त आहे.

इंधन तेल

‘ओव्हीएल’कडून कोलंबियामध्ये लालनोसच्या खोऱ्यातील गाळप्रदेशातील सात ब्लॉकमध्ये इंधनसाठे शोधण्याचे काम सुरू आहे. या ब्लॉक्समध्ये ‘ओव्हीएल’चा 70 टक्के हिस्सा आहे. तसेच कोलंबियातीलच आणखी दोन ब्लॉकमध्ये दुसऱ्या एका कंपनीबरोबर 50 टक्के हिस्सेदारीत ‘ओव्हीएल’कडून उत्खनन सुरू आहे. लालनोसच्या खोऱ्यातील सात पैकी ‘सीपीओ-5’ ब्लॉकमध्ये या साठ्याचा शोध लागला आहे. या ब्लॉकमधील ‘इंडिको-2’ या तेलविहरीत उत्खनन करताना 147 फूट खोलीत इंधन तेलाचा साठा सापडला.

प्राथमिक अंदाजानुसार येथून प्रत्येक दिवसाला 6300 बॅरल इंधन तेल मिळू शकेल, असा अंदाज आहे. याच ब्लॉकमध्ये 2018 च्या डिसेंबर महिन्यात ‘ओव्हीएल’ला ‘इंडिको-1एक्स’ या तेल विहरीत मोठा साठा सापडला होता. येथून प्रति दिन 5 हजार 200 बॅरल इतके इंधन मिळत आहे. ‘सीपीओ-5’ हे इंधन उत्खनन क्षेत्र 1,992 चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेले असून ‘ओव्हीएल’ या भागात आणखी तेल विहरी खणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे येत्या काळात ‘ओव्हीएल’ला आणखी काही इंधनसाठ्यांचा शोध लागण्याची शक्यता आहे. ‘ओव्हीएल’कडे सध्या जगातील 17 देशांमधील 37 इंधन तेल आणि वायूच्या ब्लॉकचा ताबा आहे. भारताच्या स्थानिक उत्पादनाच्या 30.3 टक्के इंधन तेलाचे आणि 13.7 टक्के नैसर्गिक वायुचे उत्पादन ‘ओव्हीएल’कडून केले जाते.

leave a reply