रशियातील इंधनतेल व वायू प्रकल्पांमध्ये हिस्सेदारी खरेदीसाठी ओएनजीसीच्या वाटाघाटी

- पेट्रोलियमंत्री हरदिप सिंग पुरी यांची माहिती

हिस्सेदारीनवी दिल्ली – भारताची ओएनजीसी विदेश कंपनी रशियातील व्होस्टोक या मोठ्या इंधनतेल प्रकल्पामध्ये, तसेच आर्क्टिक एलएनजी-२ प्रकल्पामध्ये हिस्सेदारी खरेदी करण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात ओएनजीसी विदेश रशियन कंपन्यांची चर्चा करीत असल्याची माहिती भारताचे पेट्रोलियम व नैसर्गिक वायूमंत्री हरदिप सिंग पुरी यांनी दिली आहे. पेट्रोलियमंत्र्यांचा तीन दिवसांचा रशिया दौरा नुकताच संपन्न झाला. रशियामध्ये इस्टर्न इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत भाग घेण्यासाठी गेलेले पेट्रोलियममंत्री पुरी यांनी भारताच्या रशियन प्रकल्पातील गुंतवणूकीमुळे दोन्ही देशांमधील ऊर्जा सहकार्य अधिक भक्कम होईल, असा विश्‍वास व्यक्त केला आहे.

दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौर्‍यात रशियाच्या पूर्वेकडील प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेण्यात आला होता. भारत आपली इंधन सुरक्षा सुनिश्‍चित करण्यासाठी निरनिराळ्या देशांबरोबर आपले ऊर्जा सहकार्य वाढवित आहे. इंधन संपन्न आखाती देशातून भारत गेली कित्येक वर्ष इंधन खरेदी करीत आला आहे. मात्र या देशांबरोबर इतर देशांशी भारत इंधन सहकार्य प्रस्थापित करीत आहे. अमेरिका, लॅटिन अमेरिकन देशांबरोबरही इंधन सहकार्य गेल्या वर्षात वाढले आहे. त्याचबरोबर भारताचा जुना मित्र देश असलेल्या रशियाबरोबर इंधन सहकार्य भक्कम करुन भारत आपली इंधन सुरक्षा निश्‍चित करण्याचा प्रयत्न करीत आहे.

या पार्श्‍वभूमीवर पेट्रोलियमंत्र्यांच्या या रशिया भेटीला महत्त्व आले होते. इस्टर्न इकॉनॉमिक फोरम दरम्यान भारताच्या ओएनजीसी विदेश आणि इंडियन ओईल या दोन कंपन्यांनी गझप्रोम या रशियाच्या सर्वात मोठ्या इंधन वायूच्या कंपनीबरोबर स्वतंत्र सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या केल्या आहेत. गझप्रोमकडून इंधन वायू खरेदी करण्यासंदर्भातील हे करार असल्याचे सांगण्यात येते. भारत आणि रशियामध्ये हे धोरणात्मक इंधन सहकार्य असल्याचे म्हटले जाते. यावेळी पेट्रोलियममंत्री हरदिप सिंग पुरी यांनी रशियाच्या फार ईस्टला असलेल्या साखालिन-आय या तेल उत्खनन प्रकल्पालाही भेट दिली. या प्रकल्पातही याआधी भारताने गुंतवणूक केली आहे.

आता भारताची ओएनजीसी विदेश व्होस्टोक या मोठ्या इंधन तेल प्रकल्पामध्ये, तसेच आर्क्टिक एलएनजी-२ या नैसर्गिक वायू प्रकल्पात हिस्सेदारी घेण्याच्या तयारीत आहे. आर्क्टिक एलएनजी-२ प्रकल्पात ९.९ टक्के हिस्सेदारी खरेदी करण्यावर ओएनजीसी वाटाघाटी करीत आहे, अशी माहिती हरदिप पुरी यांनी दिली आहे. आपली रशिया भेट यशस्वी ठरल्याचेही हरदिप सिंग पुरी यांनी अधोरेखित केले. गझप्रोम व्यतिरिक्त रोसनेफ्ट, नोव्हाटेक या कंपन्याही भारताबरोबर इंधन सहकार्य वाढवित आहेत. रशियाचे ऊर्जामंत्री निकोलाय शुल्गिनोव्ह यांच्याशी पुरी यांनी याबाबत चर्चा केली आहे.

leave a reply