महाराष्ट्रातील अतिवृष्टीमधील बळींची संख्या 149 वर 64 जण अजूनही बेपत्ता

- कोल्हापूर, सांगली, सातार्‍यातील परिस्थिती अद्याप बिकट

नवी दिल्ली – महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीने आलेला पूर, दरड कोसळण्याच्या घटना व इतर दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 149 जणांचा बळी गेल्याचे स्पष्ट झाले आहे. तर 64 हून अधिक जण अजून बेपत्ता असून बळींची संख्या दोनशेच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. तसेच झालेल्या प्रचंड आर्थिक नुकसानाचा अंदाज अद्याप बांधता आलेला नाही. कोकणातील जिल्ह्यांमध्ये पावसाच्या विश्रांतीमुळे पुराचे पाणी ओसरले असते, तरी कोल्हापूर, सांगली, सातारा या पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती अद्यापही बिकट आहे.

महाराष्ट्रातील अतिवृष्टीमधील बळींची संख्या 149 वर 64 जण अजूनही बेपत्ता - कोल्हापूर, सांगली, सातार्‍यातील परिस्थिती अद्याप बिकटमहाराष्ट्रात गुरुवारपासून दरड कोसळण्याची कितीतरी लहान मोठ्या घटनांची नोंद झाली आहे. तसेच घराचा भाग कोसळणे, जमिन खचणे, वृक्ष उन्मळून पडण्याच्या असंख्य घटना घडल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण, खेड, संगमेश्वर, लांजा सारख्या बाजारपेठा पाण्याखाली होत्या. रायगडमध्ये महाडमध्ये अतिशय भीषण स्थिती होती. पाणी ओसरल्यानंतर येथे फक्त चिखलाचे साम्राज्य आहे. अद्यापही काही भागात वीज पुरवठा सुरू झालेला नाही. तसेच काही ठिकाणी पाणीपुरवठाही बंद आहेत. घरातील सर्व चीजवस्तू खराब झाल्याने कित्येक कुटुंबाना आता भविष्याचा प्रश्‍न सतावत आहे.

रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये 89 जणांचा बळी गेला आहे, तर अद्याप 34 जण बेपत्ता आहेत. तर अतिवृष्टीदरम्यान इतर घटनांमध्ये मिळून एकूण 149 जणांचा बळी गेला असून 64 जण बेपत्ता असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. सर्वाधिक 60 बळी रायगडमध्ये गेले आहेत. त्यानंतर रत्नागिरीत 21, सातार्‍यात 41, ठाणे जिल्ह्यात 12, कोल्हापूरात सात, मुंबई उपनगरात चार, सिंधुदूर्ग आणि पुण्यात प्रत्येक दोन बळी गेले आहेत. रविवारी सातारा आणि रायगडमध्ये ढिगार्‍याखाली गाडले गेलेले 36 मृतदेह बाहेर काढण्यात आले. तसेच 50 जण जखमी झाले आहेत.

महाराष्ट्रातील अतिवृष्टीमधील बळींची संख्या 149 वर 64 जण अजूनही बेपत्ता - कोल्हापूर, सांगली, सातार्‍यातील परिस्थिती अद्याप बिकटअनेक ठिकाणी बचावकार्य सुरू असून महाराष्ट्रात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) 34 पथके सध्या बचावकार्यात सहभागी झालेली आहेत. याशिवाय वायुसेना, लष्कर, नौदलही या बचावकार्यात उतरले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये कृष्णा, पंचगंगा, वारणा, कोयनासारख्या नद्यांमध्ये पाणी धोक्याच्या पातळीवर आहे व घाटमाथ्यांवर सतत पाऊस सुरू आहे. यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील कित्येक भागात अजून पुराचे पाणी तसेच आहे. ठिकठिकाणी नागरिक अडकून पडले आहेत. त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सतत सुरू आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा व पुण्यामधील 875 गावे पुरामुळे बाधीत झाली आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. या जिल्ह्यांमधील सुमारे 2 लाख 29 हजाराहून अधिक जणांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले आहे.

दरम्यान, अतिवृष्टी, पूर, दरड कोसळण्यासारख्या आपत्तीमध्ये वेगाने बचावकार्य सुरू करता यावे यासाठी एनडीआरएफच्या धर्तीवर राज्यातही स्वतंत्र दल तयार करण्यात निर्णय घेण्यात आला आहे.

leave a reply