संतापलेल्या अफगाणिस्तानने पाकिस्तानातील राजनैतिक अधिकार्‍यांना मायदेशी बोलावले

- अफगाणी राजदूतांच्या लेकीचे अपहरण झालेच नसल्याचा पाकिस्तानचा कांगावा

राजनैतिक अधिकार्‍यांना मायदेशीकाबुल/इस्लामाबाद – अफगाणिस्तानचे राजदूत नजिबुल्लाह अलीखिल यांच्या मुलीचे अपहरण व छळ याचा तपास करण्याच्या ऐवजी दोषारोप करणार्‍या पाकिस्तानला अफगाणिस्तानच्या सरकारने चांगलाच धक्का दिला. पाकिस्तानातील राजदूत व राजनैतिक अधिकार्‍यांना मायदेशी बोलावून अफगाणी सरकारने पाकिस्तानला या प्रकरणाच्या गांभिर्याची जाणीव करून दिली. अफगाणी राजदूतांच्या लेकीचे अपहरण झालेच नव्हते, अशी शेरेबाजी पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षामंत्र्यांनी केली होती. अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अत्मार यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांना फोन करून त्यांच्या या विधानाचे दोन्ही देशांच्या संबंधांवर विपरित परिणाम होतील, असा इशारा दिला आहे. दरम्यान, पाकिस्तानने अफगाणिस्तानातील आपल्या राजदूताला माघारी बोलावल्याच्या बातम्या येत आहेत.

राजनैतिक अधिकार्‍यांना मायदेशीगेल्या आठवड्यात पाकिस्तानातील अफगाणिस्तानचे राजदूत नजिबुल्लाह अलीखिल यांची कन्या सिलसिला अलीखिल हिचे अपहरण झाले होते. काही तासांनी सुटका झालेल्या सिलसिलाचा अपहरणकर्त्यांनी छळ केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्याचबरोबर या अपहरणकर्त्यांनी पाकिस्तानी चलनावर राजदूत नजिबुल्लाह यांचे अपहरण करण्याची धमकी दिली होती. या प्रकरणाची पाकिस्तानने गंभीर दखल घ्यावी व चौकशी करावी, अशी मागणी अफगाणी सरकारने केली होती.

पण पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षामंत्री शेख रशिद अहमद यांनी अफगाणी राजदूतांच्या लेकीचे अपहरण झालेच नाही, असा कांगावा करून नव्या टीकेला आमंत्रण दिले. शेख रशिद यांनी अफगाणी राजदूत सिलसिला हिच्या अपहरणाचे आंतरराष्ट्रीय नाट्य रचले गेल्याचा अजब दावा केला. यामागे भारतीय गुप्तचर यंत्रणा असल्याचा ठपका शेख रशिद यांनी ठेवला. तसेच यामागे पाकिस्तानला बदनाम करण्याचा भारताच्या गुप्तचर संस्थेचा कट असल्याचा दावा रशिद यांनी केला. पाकिस्तानच्या पोलीस यंत्रणेनेही या आरोपांना दुजोरा दिला आहे.

पाकिस्तानच्या या दाव्यावर अफगाणिस्तानात संतापाची लाट उसळली आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी पाकिस्तानातील आपले राजदूत तसेच वरिष्ठ राजनैतिक अधिकार्‍यांना तातडीने माघारी बोलावले. अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री हनिफ अत्मार यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना फोन करून रशिद यांच्या बेताल विधानांवर टीका केली. ‘रशिद यांची अव्यावसायिक विधाने आणि उतावीळ मतप्रदर्शन अफगाण-पाकिस्तानातील संबंधांची हानी करतील, त्याचबरोबर या प्रकरणाच्या चौकशीबाबत पाकिस्तान आपली विश्‍वासार्हता गमावून बसेल’, असा इशारा अत्मार यांनी दिला. अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी देखील राजदूत नजिबुल्लाह यांच्या लेकीबाबत घडलेल्या घटनेवर अफगाणी जनतेची भावना मांडली. या अपहरणाद्वारे अफगाणिस्तानच्या अस्मितेवर घाव घालण्यात आल्याची जळजळीत प्रतिक्रिया उपराष्ट्राध्यक्ष सालेह यांनी नोंदविलेली आहे.

दरम्यान, अंतर्गत सुरक्षामंत्री शेख रशिद यांच्या विधानांवर पाकिस्तानातील काही सूज्ञ पत्रकार देखील टीका करीत आहेत. अफगाणी राजदूताच्या मुलीच्या अपहरणाचे हे प्रकरण अतिशय गंभीर असून कुठल्याही ठोस पुराव्याशिवाय अशाप्रकारे दावे करू नका, असा सल्ला हे पाकिस्तानी पत्रकार देत आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पाकिस्तानची प्रतिमा अधिकच मलिन होईल, अशी चिंता या पत्रकारांकडून व्यक्त केली जात आहे.

leave a reply