‘वुहान लॅब लीक’च्या तपासामुळे बिथरलेल्या चीनच्या अमेरिकेला धमक्या

बीजिंग – चीनने कोरोनाचा विषाणू तयार करून जगभरात पसरविल्याचा आरोप करणारी ‘वुहान लॅब लीक थिअरी’ जगभरात स्वीकारली जात आहे. संशोधक व विश्‍लेषक यासाठी चीनवर गंभीर आरोप करीत आहेत. या दडपणामुळे आधीच्या काळात याचा तपास गुंडाळून ठेवणार्‍या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी गुप्तचर संस्थांना या तपासाचे अहवाल सादर करण्याचे आदेश द्यावे लागले. यामुळे संतापलेल्या चीनने अमेरिकेला धमक्या देण्याची सुरूवात केली आहे. कोरोनावरून अमेरिकेने राजकीय खेळ करू नये, असे चीनच्या सरकारी मुखपत्राने बजावले आहे. अमेरिकेने तसे केल्यास हे अमेरिकेचे ‘वॉर्टलू’ बनेल, असा इशारा चीनच्या मुखपत्राने दिला आहे.

‘वुहान लॅब लीक’चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेत कोरोनाचा विषाणू तयार झाल्याचे दावे जबाबदार संशोधक करीत आहेत. ब्रिटन व ऑस्ट्रेलियाच्या वर्तमानपत्रांनी कोरोनाची साथ म्हणजे चीनने छेडलेले जैविक युद्ध असल्याचे आरोप करणारी अत्यंत संवेदनशील माहिती उघड केली. वुहानच्या प्रयोगशाळेत काम करणार्‍या संशोधकांनीही या आरोपांना दुजोरा देऊन त्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे जाहीर केले आहे. अमेरिकेचे विश्‍लेषक या प्रकरणी चीनला धारेवर धरून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्‍न उपस्थित करीत आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ‘वुहान लॅब लीक’बाबत 90 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश गुप्तचर संस्थांना दिले आहेत. यासाठी अमेरिकेचा गुप्तचर विभाग ब्रिटनच्या गुप्तचर संस्थांचे सहाय्य घेत आहे. ऑस्ट्रेलिया, जपान व भारत या प्रमुख देशांनी कोरोनाचा तपास करण्याची मागणी उचलून धरली.

पुढच्या काळात ‘कोविड-26’, ‘कोविड-32’ सारख्या नव्या भयंकर साथींचा सामना करायचा नसेल, तर कोरोनाच्या साथींचे मूळ शोधण्यावाचून पर्याय नाही, असा इशारा विख्यात संशोधक डॉ. पीटर हॉटेझ आणि अमेरिकेचे माजी अधिकारी स्कॉट गॉटिलेब यांनी दिला आहे. यामुळे आपल्या विरोधात वातावरण तयार होत असल्याचे पाहून चीन कमालीचा अस्वस्थ झाला आहे. चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने यावरून थेट अमेरिकेलाच धमकी दिली. कोरोनाच्या तपासावरून राजकीय खेळ करू नका, असा इशारा ग्लोबल टाईम्सने दिला आहे. फ्रेंच सेनानी नोपोलियन बोनापार्ट ‘वार्टलू’च्या युद्धापर्यंत कायम जिंकत आला होता. पण वार्टलूच्या लढाईतील पराभवानंतर नेपोलियन संपला. कोरोनाचा तपासाचा अमेरिकेचा चीनविरोधी निर्णय म्हणजे वॉर्टलू ठरेल, असे ग्लोबल टाईम्सने धमकावले आहे.

‘वुहान लॅब लीक’चीनकडून दिले जाणारे हे इशारे व धमक्या या देशावरील संशय अधिकच वाढविणारे ठरतात. चीनचे विश्‍लेषक व संशोधक आपल्या देशाच्या राजवटीचा बचाव करण्यासाठी पुढे सरसावल्याचे समोर येत आहे. कोरोनाच्या साथीचा तपास गुप्तचर विभागाकडून नाही, तर संशोधकांकडून होणे अपेक्षित आहे, असे चीनच्या सेंटर फॉर डिसिज् कंट्रोलचे तज्ज्ञ झेंग गुआंग यांनी म्हटले आहे.

गुप्तचर संस्थांनी नाही, तर संशोधकांनी कोरोनाचा तपास करावा व हा तपास कुणा एका देशाच्या अधिकाराखाली असू शकत नाही, अशी मागणी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. मात्र चीन याबाबत करीत असलेली लपवाछपवी पाहता, सदर तपास गुप्तचर विभागाकडे सोपविण्यावाचून पर्याय नसल्याचे याआधीही स्पष्ट झाले होते. 2019 सालच्या डिसेंबर महिन्याच्याही आधी वुहान येथील प्रयोगशाळेत काम करणार्‍या संशोधकांना कोरोनाची लागण झाली होती. पण चीनने ही बाब जगापासून दडवून ठेवली. बराच काळ आपल्या देशातल्या या साथीची माहिती चीनने उघड केली नाही. त्यामुळे ही साथ जगभरात पसरली व त्याचे भयंकर परिणाम जगाला भोगावे लागत आहेत. हा चीनने केलेला भयंकर अपराध ठरतो व त्याची जबाबदारी चीनला स्वीकारावीच लागेल, अशी मागणी जगभरात जोर पकडत आहे.

अद्याप अधिकृत पातळीवर चीनच्या विरोधात कुठल्याही देशाने थेट आक्रमक भूमिका घेतलेली नाही. पण वुहान लॅब लीक प्रकरणाची चौकशी म्हणजे आपल्यावरील हल्लाच ठरतो, असा संदेश चीन प्रमुख देशांना देत आहे. यामुळे चीन बिथरला असून चीनच्या विरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर एकजूट होत असल्याचे दिसू लागले आहे.

leave a reply