हफीज सईदच्या घराजवळील स्फोटामागे भारताचा हात

- पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा आरोप

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या लाहोरमधील कुख्यात दहशतवादी हफीज सईद याच्या घराजवळ झालेल्या कारबॉम्बच्या स्फोटामागे भारत असल्याचा आरोप पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केला आहे. तपास यंत्रणांना याचे पुरावे मिळाल्याचे सांगून पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताच्या पाकिस्तानविरोधातील दहशतवादी कारवायांची आंतरराष्ट्रीय समुदायाने दखल घ्यावी, अशी मागणी केली. मात्र आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे केंद्र असलेल्या पाकिस्तानच्या या आरोपांकडे कुणीही गंभीरपणे पाहण्याची शक्यता नाही. उलट हफीज सईदसारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवाद्याच्या सुरक्षेबाबत पाकिस्तान दाखवित असलेल्या या संवेदनशीलतेचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटू शकतात.

हफीज सईदच्या घराजवळील स्फोटामागे भारताचा हात - पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा आरोपसोशल मीडियावर पंतप्रधान इम्रान खान यांनी लाहोरच्या जोहर टाऊन येथील हफीज सईदच्या घराजवळ झालेल्या बॉम्बस्फोटामागे भारत असल्याचे जाहीर करून टाकले. तसेच याचा तपास करणार्‍या पाकिस्तानी यंत्रणांचे इम्रान खान यांनी कौतूक केले. त्याचवेळी पाकिस्तानच्या विरोधातील भारताच्या या दहशतवादी कारवायांची दखल आंतरराष्ट्रीय समुदायाने घ्यावी, असे आवाहन करून इम्रान खान यांनी भारतच दहशतवादात गुंतलेला असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावरील त्यांच्या या आरोपानंतर पाकिस्तानचे माहिती व प्रसारणमंत्री फवाद चौधरी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी पत्रकार परिषद आयेजित करून भारतावर दहशतवादाचे आरोप केले.

या प्रकरणी भारताची गुप्तचर संघटना रॉच्या हस्तकाला ताब्यात घेण्यात यश मिळाल्याचा दावा मोईद युसूफ यांनी केला आहे. त्याचवेळी जम्मूमधील भारतीय वायुसेनेच्या तळावरील स्फोट म्हणजे लाहोरमधील बॉम्बस्फोटाकडून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी भारताने केलेला ‘ड्रामा’ असल्याचे युसूफ यांनी म्हटले आहे. तसेच भारतातून पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणात सायबर हल्ले चढविले जात आहेत, पण पाकिस्तानच्या यंत्रणांकडे देशाचे सायबर क्षेत्र सुरक्षित ठेवण्याची क्षमता असल्याचा दावा मोईद युसूफ यांनी केला. आपल्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवरून होत असलेल्या दहशतवादाच्या आरोपांची तीव्रता कमी करणे, हाच पाकिस्तानच्या भारतावरील आरोपांमागील हेतू असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

जम्मूमधील वायुसेनेच्या तळावर ड्रोनद्वारे पाकिस्तानने घडविलेल्या स्फोटाला भारत योग्य वेळी योग्य ते प्रत्युत्तर देईल, असे संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी म्हटले होते. त्यांच्या या इशार्‍याला दिवस उलटत नाही तोच, पाकिस्तानने भारतावरच दहशतवादाचे हे आरोप केले आहेत. तर पाकिस्तानचे काही पत्रकार मात्र हफीज सईदच्या घराजवळील बॉम्बस्फोटाचे परिणाम पाकिस्तानलाच सहन करावे लागतील, असा तर्क मांडत आहेत. एफएटीएफच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत अजूनही पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कठोर कारवाई केलेली नाही, असे सांगून पाकिस्तानाला ग्रे लिस्टमध्ये कायम ठेवण्याचा निर्णय झाला होता. त्याच्या आधी हफीज सईदच्या घराजवळ झालेला स्फोट म्हणजे मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवण करून देण्याचा प्रयत्न असल्याचे या पाकिस्तानी पत्रकाराचे म्हणणे आहे.

‘लश्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आणि ‘जमात-उल-दवा’चा प्रमुख असलेल्या हफीज सईद याच्या विरोधात त्याचेच काही सहकारी गेले आहेत, याकडे भारतीय पत्रकार लक्ष वेधत आहेत. याच्या आधी हफीज सईदच्या नातेवाईकांवर पाकिस्तानात हल्ले झाले होते. त्यामुळे हफीज सईद याच्या घराजवळील बॉम्बस्फोटामागे भारत नसून त्याचेच दहशतवादी प्रतिस्पर्धी असण्याची शक्यता आहे, मात्र या प्रकरणी आपला बचाव करण्यासाठी पाकिस्तान भारतावर दोषारोप करीत आहे. सुरूवातीच्या काळात हा बॉम्बस्फोट नसून सिलेंडरचा स्फोट असल्याचा दावा पाकिस्तानच्या यंत्रणांनी केला होता. मात्र स्थानिकांनी याबाबतची माहिती आधीच माध्यमांसमोर उघड केल्याने हा कारबॉम्बचा स्फोट असल्याचे पाकिस्तानच्या यंत्रणांना मान्य करावे लागले. आता यासाठी भारतावर आरोप करून पाकिस्तान आपल्या दहशतवादी कारवायांवर पांघरूण घालण्याची तयारी करीत आहे.

leave a reply