काबुलमधील गुरूद्वारावरील हल्ल्याच्या सूत्रधाराला ताब्यात द्या – पाकिस्तानची अफगाणिस्तानकडे मागणी

इस्लामाबाद – अफगाणिस्तानच्या काबुलमधील शीख धर्मीयांच्या गुरुद्वारावर भ्याड हल्ला चढविणाऱ्या मौलवी अब्दुल्ला उर्फ अस्लम फारुखी याला अफगाणी सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. लष्कर-ए-तोयबा व हक्कानी नेटवर्क या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांचा हस्तक असलेला हा मौलवी अब्दुल्ला आधीच्या काळात लष्कर-ए-तोयबा व हक्कानी नेटवर्क या पाकिस्तान पुरस्कृत संघटनांसाठी काम करीत होता. त्यामुळे काबुलमधील या भ्याड हल्ल्याचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले होते. या पार्श्वभूमीवर मौलवी अब्दुल्ला याला चौकशीसाठी आपल्याकडे सोपविण्यात यावे अशी मागणी पाकिस्तानने केली आहे.

सध्या अफगाणिस्तानातील ‘इस्लामिक स्टेट ऑफ खोरासान प्रोविंस’(आयएसकेपी) या आयसीस संलग्न दहशतवादी संघटनेसाठी काम करीत असलेला मौलवी अब्दुल्ला याला काबूलमधील भारतीय दूतावासावर हल्ला चढवायचा होता. पण कडेकोट बंदोबस्तामुळे ते शक्य झाले नाही. म्हणूनच त्याने शीख धर्मियांच्या गुरुद्वारावर भ्याड दहशतवादी हल्ला चढवून २२ जणांचा बळी घेतला होता. यानंतर काही दिवसातच मौलवी अब्दुल्ला याला अफगाणी सुरक्षा यंत्रणांनी संयुक्त मोहीम हाती छेेेडून अटक केली होती. मौलवी अब्दुल्ला याच्या २० साथीदारांनाही अफगाणी यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे.

मौलवी अब्दुल्ला व त्याच्या साथीदारांना झालेल्या अटकेनंतर पाकिस्तान खडबडून जागा झाला असून हा दहशतवादी आपल्या ताब्यात देण्यात यावा, अशी मागणी पाकिस्तानने केली आहे. आपल्या देशातील काही दहशतवादी हल्ल्यांमागे मौलवी अब्दुल्ला याचा हात असावा, असा संशय व्यक्त करून पाकिस्तानने ही मागणी पुढे केली आहे. एरवी दहशतवाद्यांवर कारवाई करण्यापेक्षा त्यांच्या संरक्षणाचीच अधिक चिंता करण्यासाठी बदनाम असलेल्या पाकिस्तानने मौलवी अब्दुल्ला याच्या बाबत दाखविलेली ही तत्परता संशय वाढवणारी ठरते.

काबूलमधील गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्याचे धागेदोरे आपल्यापर्यंत पोहोचू नये, यासाठी पाकिस्तानची ही सारी धडपड चालली असावी, अशी दाट शक्यता समोर येत आहे. त्यामुळे अफगाणिस्तानी सुरक्षा यंत्रणांकडून सध्या तरी पाकिस्तानची ही मागणी मान्य होण्याची अजिबात शक्यता नाही. पण यामुळे अफगाणिस्तानातील दहशतवादी व पाकिस्तानचे संबंध पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.

leave a reply