शरणांगती पत्करलेल्या दहशतवाद्याकडून पाकिस्तानचा पर्दाफाश

नवी दिल्ली – २५ सप्टेंबर रोजी जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरून सात दहशतवाद्यांनी घुसखोरी केली होती. मात्र भारतीय सैनिकांनी गोळीबार सुरू केल्यानंतर यातले चार दहशतवादी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये पळून गेले. तर दोन दहशतवाद्यांना भारतीय सैनिकांनी ठार केले. एका दहशतवाद्याने मात्र शरणांगती पत्करली असून तो पाकिस्तानचा नागरिक असल्याचे भारतीय लष्कराच्या अधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

शरणांगती पत्करलेल्या दहशतवाद्याकडून पाकिस्तानचा पर्दाफाशअली बाबर पात्रा असे या १९ वर्षाच्या दहशतवाद्याचे नाव आहे. तो पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या ओखराचा रहिवासी आहे. ‘लश्कर-ए-तोयबा’ने त्याला दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण दिले. काश्मीरमध्ये भारतीय लष्कर अत्याचार करीत असल्याची खोटी माहिती आपल्याला देण्यात आली व दहशतवादी कारवायांसाठी उकसविण्यात आले, असे अली यांनी म्हटले आहे. मात्र इथे आपल्याला तसे काहीच दिसले नाही. पकडल्यानंतरही आपल्याला मारहाण झालेली नाही व छळ करण्यात आलेला नाही, असे अली याने म्हटले आहे.

‘लश्कर’मध्ये सहभागी झाल्यानंतर मला सुमारे २० हजार रुपये इतकी रक्कम मिळाली होती, एलओसी पार करून काश्मीरमध्ये दाखल झाल्यानंतर आणखी ३० हजार रुपये माझ्या कुटुंबाला दिले जाणार होते, अशी माहिती अली याने दिली. मात्र ज्या हेतूसाठी आपल्याला इथे पाठविण्यात आले तो हेतू पूर्णपणे चुकीचा असल्याचा संदेश अली याने दिला आहे. काश्मीरबाबत पाकिस्तान पसरवित असलेली माहिती अत्यंत चुकीची आहे, असे सांगून आपले अनुकरण न करण्याचा सल्ला अली याने पाकिस्तानच्या तरुणांना दिला. दरम्यान, अली याची ओळख पटवून भारतीय लष्कराच्या अधिकार्‍यांनी त्याच्या आईचा मोबाईल नंबर जाहीर केला आहे.

यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा पर्दाफाश झाला आहे. अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर, त्याचा लाभ घेऊन पाकिस्तान जम्मू व काश्मीरमध्ये दहशतवादाचे नवे सत्र सुरू करील, असा इशारा विश्‍लेषकांनी दिला होता. त्यांचे म्हणणे खरे करण्यासाठी पाकिस्तानने फारसा अवधी घेतलेला नाही. मात्र पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांना नियंत्रण रेषेवरच रोखून ठार करण्याचा सपाटा भारतीय सैनिकांनी लावला आहे. यामुळे दहशतवादी कारवायांद्वारे जगाचे काश्मीरकडे लक्ष वेधण्याचे पाकिस्तानचे कारस्थान अपयशी ठरले. विशेषतः भारताचे पंतप्रधान अमेरिकेच्या दौर्‍यावर असताना व संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत भाषण करीत असताना घातपात घडवून आणण्याचा भयंकर कट पाकिस्तानने आखला होता, असा दावा भारताचे काही माजी लष्करी अधिकारी करीत आहेत. पण भारतीय सैनिकांनी हा कट हाणून पाडला.

अली बाबर पात्राला जिवंत पकडण्यात यश मिळाल्याने, या प्रकरणी सारवासारव करणे पाकिस्तानसाठी अधिकच अवघड बनणार आहे. काही दिवसांपूर्वी भारत दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचे दावे करून त्याचे खोटेनाटे पुरावे संयुक्त राष्ट्रसंघाकडे सुपूर्द करून आपण फार मोठा पराक्रम केल्याचे दावे पाकिस्तानच्या मंत्र्यांनी केले होेते. पण आता जिवंत दहशतवाद्याची ओळख नाकारून आपल्यावरच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी पाकिस्तानला धावपळ करावी लागणार आहे.

leave a reply