भारताच्या हल्ल्याच्या धास्तीने पाकिस्तानची विमाने हवेत

नवी दिल्ली/ इस्लामाबाद – भारत आपल्यावर हल्ला चढविल या भीतीने पाकिस्तानची गाळण उडाली आहे. म्हणूनच भारताच्या हद्दीजवळ पाकिस्तानी हवाईदलाची ‘एफ-१६’ व ‘जेएफ-१७’ लढाऊ विमाने गस्त घालू लागली आहेत. याबरोबरच या क्षेत्रात हवाई सरावाचे आयोजन करून पाकिस्तान आपण तयार असल्याचा संदेश भारताला देऊ पाहत आहे. पण प्रत्यक्षात भारताच्या आक्रमक कारवाईच्या धास्तीने पाकिस्तान भयकंपित झालेला आहे, असा दावा भारतीय सामरिक विश्‍लेषक तसेच माजी लष्करी अधिकारी करीत आहेत. पाकिस्तानची ही भीती या देशाच्या हालचालींवरून स्पष्टपणे दिसून येत आहे, असे या विश्लेषकांचे तसेच माजी लष्करी अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे, गुप्तचर विभाग तसेच निमलष्करी दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेचा आढावा घेतला. गेल्याच आठवड्यात जम्मू-काश्मीरच्या हंडवारा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाच जवान शहीद झाले होते. त्यानंतर देशाच्या सुरक्षादलांनी हिजबुल मुजाहिदीनचा खतरनाक दहशतवादी रियाज नायकूला त्याच्या साथीदारांसह ठार केले होते. या कारवाईचे पडसाद पाकिस्तानातही उमटले होते.

भारत केवळ रियाज नायकूला ठार करून तेथेच थांबणार नाही तर पुढच्या काळात आपल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी भारत पीओके वर हल्ला चढविल आणि गिलगिट बाल्टिस्तान ताब्यात घेण्यासाठी ही लष्करी कारवाई करील, अशी चिंता पाकिस्तानचे माध्यमे व्यक्त करू लागली आहेत. इतकेच नाही तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील भारत खोट्या दहशतवादी हल्ल्याचा बनाव रचून पाकिस्तानवर हल्ला चढविल, अशी चिंता व्यक्त केली होती. मात्र पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी व्यक्त केलेली ही शाब्दिक चिंता कूचकामाची ठरेल. भारताच्या हल्ल्यासमोर आपला निभाव लागणार नाही, असे दावे पाकिस्तानचे लष्करी विश्लेषक करू लागले आहेत.

पंतप्रधान इम्रान खान यांना भारताच्या हल्ल्याची भीती वाटत असेल तर मग त्याला तोंड देण्यासाठी त्यांनी काय तयारी केली आहे ,असा प्रश्न पाकिस्तानचे माजी लष्करी अधिकारी विचारत आहेत. भारताला कितीही धमक्या दिल्या तरी भारतीय लष्कराच्या सामर्थ्यासमोर पाकिस्तानी लष्कराचा निभाव लागणे शक्य नाही, याची कबुलीही हे माझे लष्करी अधिकारी देत आहेत. अशा परिस्थितीत भीतीने गाळण उडालेल्या पाकिस्तानी संरक्षणदलांकडून भारताला प्रत्युत्तर देण्याची आपली तयारी झाल्याचे चित्र उभे केले जात आहे .यासाठीच पाकिस्तानच्या हवाई दलाची लढाऊ विमाने भारताच्या नजीकच्या हवाई हद्दीत गस्त घालू लागली आहेत.

पाकिस्तानी हवाई दलांच्या ‘एफ-१६’ , जेएफ-१७ ‘ या लढाऊ विमानांची गस्त म्हणजे पाकिस्तानला वाटत असलेल्या भीतीचे जाहीर प्रदर्शन असल्याचे सांगून भारताचे सामरिक विश्लेषक पाकिस्तानची खिल्ली उडवित आहेत. त्यातच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि लष्कर प्रमुख तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पाकिस्तानची धडधड अधिकच वाढविली आहे.

काही दिवसांपूर्वी भारताच्या हवामान विभागाने पीओके तसेच गिलगिट बाल्टिस्तानच्या हवामानाची माहिती देऊन हा भारताचा अधिकृत भाग असल्याची आठवण पाकिस्तानला करून दिली होती. त्यानंतर दूरदर्शन व ऑल इंडिया रेडिओनेही देखील याचे अनुकरण केले होते. यामुळे भारत लवकरच पीओके व गिलगिट बाल्टिस्तानचा ताबा घेण्यासाठी हल्ला चढविल,अशी चिंता पाकिस्तानची माध्यमे व्यक्त करू लागली होती. या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानने भारताच्या जवळच्या हवाई हद्दीत सुरू केलेली गस्त म्हणजे भारताचा हल्ला टाळण्यासाठी केलेले प्रयत्न ठरतात.

हंडवारा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पुन्हा बालाकोटसारखा हवाई हल्ला करू शकतो. हे टाळायचं असेल तर हवाई गस्ती शिवाय पर्याय नाही, असा काहीसा पाकिस्तानचा तर्क असल्याचे दिसते.मात्र पीओके व गिलगिट बाल्टिस्तान हा भारताचा अविभाज्य भाग असून तो ताब्यात घेण्याचा प्लॅन लष्कराकडे पूर्णपणे तयार आहे, असे जाहीर करून माजी लष्कर प्रमुख जनरल व्ही के सिंग यांनी पाकिस्तानवरील मानसिक दबाव अधिकच वाढविला आहे. योग्यवेळी भारतीय लष्कर आपला हा प्लॅन कार्यान्वित करील, असेही पुढे माजी लष्करप्रमुख जनरल व्ही के सिंग यांनी बजावले आहे.

leave a reply