पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शरीफ यांनी लष्कराविरोधात दंड थोपटले

इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानच्या लष्कराविरोधात दंड थोपटले आहेत. ‘आमचा संघर्ष इम्रान खान विरोधात नाही. तर त्यांच्यासारख्या अयोग्य व्यक्तीला सत्तेवर आणून पाकिस्तानचा सत्यानाश करणार्‍यांच्या विरोधात आमची लढाई सुरू आहे’, अशा शब्दात नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानच्या लष्कराला लक्ष्य केले. तसेच पाकिस्तानच्या लष्करातील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करुन देशापेक्षा लष्कर मोठे बनल्याचा घणाघाती हल्ला माजी पंतप्रधान शरीफ यांनी चढविला. त्याचबरोबर पुढच्या महिन्यापासून पाकिस्तानात इम्रान सरकार आणि लष्कराविरोधात निदर्शने सुरू करण्याची घोषणा शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी केली.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी जवळपास एक वर्षानंतर राजकारणात प्रवेश केला आहे. पाकिस्तानातील इम्रान खान यांचे सरकार आणि लष्कराविरोधात शरीफ यांनी पाकिस्तानातील विरोधी पक्षांची मोठी आघाडी उघडली आहे. यामध्ये शरीफ यांच्या ‘पाकिस्तान मुस्लिम लीग – नवाझ’सह, माजी राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांची ‘पाकिस्तान पिपल्स पार्टी’ तसेच मौलाना फझलूर-रेहमान यांच्या ‘जमात उलेमा-ए-इस्लाम’ यांच्या पक्षांचा प्रामुख्याने सहभाग होता. या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन ‘पाकिस्तान डेमोक्रॅटीक मुव्हेमेंट’ (पीडीएम) सुरू केली असून यादरम्यान शरीफ यांनी पाकिस्तानची खालावलेली आर्थिक स्थिती, लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा भ्रष्टाचार, इतर देशांबरोबरील संबंध बिघडवणे तसेच माध्यमांची मुस्काटदाबी आणि इम्रान सरकारचा नाकर्तेपणा यावर तोफ डागली.

पाकिस्तानातील इम्रान खान यांचे सरकार सत्तेवर निवडून आलेले नाही तर लष्कराने निवडलेले सरकार असल्याचा आरोप शरीफ यांनी केला. त्यामुळे, हे निवडलेले सरकार आणि व्यवस्था काढून टाकणे ही सर्वात मोठी प्राथमिकता असल्याचे आवाहन माजी पंतप्रधानांनी यावेळी केले. इम्रान सरकार आणि लष्कराने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचे हसे केले असून वेळीच हे बदल झाले नाहीत तर देशाचे मोजता येणार नाही, एवढे नुकसान होईल, असा दावा शरीफ यांनी केला. तर सध्या देशात लष्कराचाच ‘मार्शल लॉ’ सुरू आहे, असा आरोप शरीफ यांनी केला. तर पाकिस्तानी लष्कराने राज्यघटनेतच रहावे व जनतेच्या निवडीत हस्तक्षेप करु नये, असा इशारा शरीफ यांनी दिला.

तर माजी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांचे नाव न घेता शरीफ यांनी पाकिस्तानच्या लष्करी व्यवस्थेवर हल्ला चढविला. पाकिस्तानच्या न्यायालयाने लष्करी हुकूमशहांना घटनेशी खेळण्याचा अधिकार दिला असून दोन वेळा घटनेची पायमल्ली करणार्‍यांची निर्दोष मुक्तता केली आहे. तर घटनेच्या मर्यादेत राहणारे अजूनही तुरूंगात खितपत पडले आहेत’, अशी खंत शरीफ यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर पाकिस्तानी लष्कराचे माजी अधिकारी जनरल असिम बाजवा हे भ्रष्टाचारी असल्याची टीका शरीफ यांनी केली. बाजवा यांनी ‘चायना पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर’ (सीपीईसी) प्रकल्पात केलेले गैरव्यवहार पाकिस्तानी माध्यमांमध्ये उघड झाले असून इतर आजी-माजी लष्करी अधिकार्‍यांची नावे देखील समोर येऊ लागली आहेत. त्यामुळे पाकिस्तानी जनतेमध्ये लष्कराची प्रतिमा पूर्णपणे मलिन झाली आहे. यामुळे पाकिस्तानची जनता अस्वस्थ बनली असून काही पत्रकार उघडपणे आता लष्कराचा भ्रष्टाचार खपवून घ्यायचा का, असा सवाल करू लागले आहेत.

leave a reply