कोरोनाव्हायरसचे संकट आलेले असताना पाकिस्तानचे सरकार जनतेच्या जीवापेक्षा अर्थव्यवस्थेला अधिक महत्त्व देत आहे

- माध्यमांची टीका

इस्लामाबाद – कोरोनाव्हायरसने पाकिस्तानात १४३ जणांचा बळी घेतला असून साडेसात हजाराहून अधिक जणांना याची लागण झाल्याचे सांगितले जाते. पण पाकिस्तान जाहीर करीत असलेली ही आकडेवारी फसवी असून पाकिस्तानच्या एकट्या कराची शहरातच आतापर्यंत चारशे जणांचा या साथीने मृत्यू झाल्याची माहिती काही पाकिस्तानी पत्रकार देऊ लागले आहेत. इतकेच नाही तर ही साथ पुढच्या काळात पाकिस्तानात हाहाकार माजविणार असल्याची चिंता हे पत्रकार व्यक्त करीत आहेत. मात्र पाकिस्तानचे सरकार आपल्या नागरिकांच्या जीवापेक्षाही अर्थव्यवस्थेची अधिक काळजी करीत आहे. या साथीचा फायदा उचलून आपले कर्ज माफ करून घेण्याच्या तयारीत असल्याची जळजळीत टीका ही सुरू झाली आहे.

पाकिस्तानच्या सर्वच प्रांतामध्ये कोरोनाव्हायरसच्या साथीचा शिरकाव झाला असून याचा फैलाव भयावहरित्या वाढू लागला आहे. सिंध प्रांतातील कराची हे शहर म्हणजे पाकिस्तानची आर्थिक राजधानी असल्याचे मानले जाते. या शहरात सध्या कोरोनाव्हायरस धुमाकूळ घालत असून याचे किमान चारशे बळी गेल्याचा दावा काही पत्रकारांनी केला. मात्र सरकार ही बाब मान्य करायला तयार नसून याबाबतीतले सरकारचे धोरण खरी माहिती दडवणे असेच राहिले आहे. ही साथ धुमाकूळ घालत असताना पाकिस्तानचे सरकार लॉकडाऊन शिथिल करून आर्थिक व्यवहारांना गती देण्याचा प्रयत्न करीत आहे. ही सर्वात धक्कादायक बाब ठरते. पाकिस्तानचे सरकार जनतेच्या जीवापेक्षाही अर्थव्यवस्थेला अधिक महत्त्व देत आहे हे यातून सिद्ध होते, अशी टीका माध्यमांकडून केली जात आहे.

कोरोनाव्हायरसचे संकट भयावह स्वरूप धारण करत असताना, पाकिस्तानचे सरकार व या सरकारचे भलेपण करणारे काहीजण मात्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक व एशियन डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून मिळालेल्या नव्या कर्जाबाबत तसेच कर्जाच्या परतफेडीबाबतच्या सवलती वर समाधान व्यक्त करत आहेत. पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या आवाहनाला आंतरराष्ट्रीय वित्त संस्थानी प्रतिसाद दिला असे सांगून त्यांचे समर्थक आपल्या पंतप्रधानांची पाठ थोपटत आहेत. मात्र हे कर्ज देखील आपल्याला फेडावे लागणार आहे, याची जाणीव पाकिस्तानला राहिलेली नाही असे या सरकारच्या टीकाकारांचे म्हणणे आहे.

पाकिस्तानसाठी कोरोनाव्हायरसपेक्षाही गरिबी व उपासमारीचे संकट अधिक भयावह ठरते, असे पंतप्रधान इम्रान खान वारंवार सांगत आहे. म्हणूनच लॉकडाऊन किंवा सोशल डिस्टसिंग यापेक्षाही पाकिस्तानचे आर्थिक व्यवहार सुरू राहावे, याला पाकिस्तानचे पंतप्रधान अधिक महत्त्व देत आहेत. याचे भयंकर परिणाम लवकरच दिसू लागतील व गणती करता येणार नाही इतक्या प्रमाणात मृतदेह पडलेले दिसतील ,अशी चिंता पाकिस्तानचे काही पत्रकार व विश्लेषक व्यक्त करू लागले आहेत. या साऱ्याला पंतप्रधान इम्रान खान यांची बेजबाबदार धोरणे कारणीभूत असतील असेही या पत्रकार तसे विश्लेषकांनी बजावले आहे.

leave a reply