अफगाणिस्तानमधल्या वाढत्या हिंसाचारामागे पाकिस्तानचा हात

- युरोपियन अभ्यासगटाचा आरोप

अ‍ॅमस्टरडॅम – पाकिस्तानकडून अमेरिका आणि तालिबानमधील शांतीकरार आणि अफगाणिस्तान-तालिबानमधील शांतीचर्चा उधळून लावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. इतकेच नाही तर अफगाणिस्तानात वाढत असलेल्या हिंसाचारामागे पाकिस्तानच असल्याचा ठपका युरोपच्या अभ्यासगटाने ठेवला आहे. पाकिस्तानला अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता हवी आहे. पण अफगाणिस्तानात भारताचा वाढत असलेला प्रभाव पाकिस्तानला खटकत असल्याचे अभ्यासगटाच्या या अहवालावरून स्पष्ट होते.

अफगाणिस्तानमधल्या वाढत्या हिंसाचारामागे पाकिस्तानचा हात‘युरोपियन फाऊंडेशन फॉर साऊथ एशियन स्टडीज’ ने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात अफगाणिस्तानमधल्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा हात असल्याचे सांगण्यात आले आहे. तालिबान आणि अफगाणिस्तानच्या सरकारमधील शांतीचर्चा उधळून लावण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करीत असल्याचेही म्हटले आहे. अफगाणिस्तानच्या शांती आणि विकासासाठी भारताची सकारात्मक भूमिका पाकिस्तानला पटत नाही. अफगाणिस्तानात तालिबानचे सरकार सत्तेवर आल्यावर भारताचा अफगाणिस्तानवरील प्रभाव कमी होईल, असे पाकिस्तानला वाटत असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला.

युरोपच्या अभ्यासगटाने अमेरिकास्थित ‘कौन्सिल ऑफ फॉरेन रिलेशन्स’च्या एका अहवालाचाही दाखला दिला आहे. या अहवालात अफगाणिस्तानमध्ये सक्रीय असलेल्या दहशतवादी संघटनांचा पाकिस्तानसोबत असलेल्या संबधांवर ताशेरे ओढण्यात आले होते. अफगाणिस्तानातील ‘हक्कानी’नेटवर्कचे पाकिस्तानसोबत असलेल्या संबंधावरुन पाकिस्तान दहतशतवाद्याला समर्थन देणारा देश असल्याचे सांगून अमेरिकेने पाकिस्तानला फटकारले होते.

दरम्यान, गेल्या काही दिवसात तालिबानचे अफगाणिस्तानातील हल्ले वाढले आहेत. काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानमधल्या तालिबानच्या हल्ल्यात ३० जणांचा बळी गेला होता. यात अफगाणी सुरक्षादलाच्या जवानांचाही सहभाग होता. या भीषण रक्तपातामागे पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप युरोपच्या अभ्यासगटाने लावला. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने तालिबानबरोबर शांतीकरारानुसार अफगाणिस्तानातील पाच लष्करी तळांवरुन सैन्यमाघार घेतली होती. त्याला काही तास उलटत नाही तोच अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांच्या जवानांमध्ये आणि तालिबानमध्ये झालेल्या चकमकीत २७ तालिबानी ठार झाले होते.

leave a reply